बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आणि एमसीसीसी क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेला आज मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला.
होनगा येथील फिनिक्स पब्लीक रेसिडेन्शिअल स्कूल मैदानावर आयोजित सदर स्पर्धा साई गार्डन रेस्टॉरंट होनगाचे संचालक व बंबरगा ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष सुरेश शंकर बिर्जे, भोमाण्णा पोटे व हुसेन गोकाक यांनी पुरस्कृत केली आहे.
आज सकाळी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक व पंच फिरोज शेख, पुरस्कर्ते सुरेश बिर्जे, भोमाण्णा पोटे, राजू कदम, फिनिक्स शाळेच्या माजी प्राचार्य अलका पाटील, महांतेश गवी, सुनील देसाई, गौस हाजी, सुरज जाधव (कोल्हापूर), विनायक मुचंडीकर व फुरखान मुल्ला उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यासह यष्टी पूजन व नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे फिरोज शेख यांनी आपल्या समयोचित भाषणात शिस्तबद्ध खेळाडू कसा असावा याबद्दल उत्तम मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आजचा उद्घाटनाचा सामना अण्णा मोगणे सहारा अकादमी कोल्हापूर आणि टीम किंग्स अकॅडमी बेळगाव या संघांमध्ये खेळविण्यात आला.
या सामन्यात अण्णा मोगणे सहारा अकादमी कोल्हापूर संघाने 71 धावांनी विजय संपादन केला. सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर, एमसीसीसी, रोजर्स क्लब व टीम किंग्ज अकॅडमी बेळगाव या चार संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.