बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी व एमसीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि साई गार्डन व रेस्टॉरंट होनगा पुरस्कृत निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या रोजर्स क्रिकेट अकादमी संघाने पटकाविले, तर कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा अकादमी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
फिनिक्स रेसिडेंशियल पब्लिक स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने गुणांच्या आधारावर रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर संघ उपविजेता ठरला.
अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार रोजर्स संघाच्या ऋतुराज गायकवाड याने तर ‘मालिकावीर’ किताब श्रेया पोटे याने हस्तगत केला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून अर्णव पाटील (कोल्हापूर) आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून साईराज कदम (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम व उपांत्य फेरीच्या सामन्यांना प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सर्फुनिस्सा सुभेदार, बाळू कांबळे, सुनील कांबळे व महांतेश गवी हे उपस्थित होते.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे पुरस्कर्ते सुरेश बिर्जे, विजेता स्पोर्ट्सचे संचालक चंद्रकांत कडोलकर, राजन कारेकर, महांतेश गवी, भोमाण्णा पोटे, क्रिकेट प्रशिक्षक सूनील देसाई, विठ्ठल भट, विनायक मुचंडीकर, फुर्कान मुल्ला आणि प्रताप बिर्जे हे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन्ही संघातील खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गौस हाजी, महांतेश गवी, सूनील देसाई आणि ग्राउंड्समन गोपाळ गवी यांनी विशेष परिश्रम घेतले.