Saturday, November 23, 2024

/

वकिलांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच; केला रास्तारोको

 belgaum

बेळगाव येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ स्थापण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून छेडलेले आंदोलन आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. संतप्त वकिलांनी आज सकाळी चेन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून रास्तारोको देखील केला

कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावला स्थापन व्हावे अशी मागणी असून ग्राहक न्यायालय आयोगाच्या अध्यक्षांनीही तशी शिफारस केली आहे. मात्र बेळगाव ऐवजी राज्य शासनाकडून कलबुर्गी येथे खंडपीठ उभारण्याची तयारी सुरू आहे. याला आक्षेप घेत बेळगाव बार असोसिएशनने काल मंगळवारी मोर्चाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्याबरोबरच न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलन छेडले आहे. आपले हे आंदोलन समस्त वकीलवर्गाने आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले होते. आज पुन्हा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालताना बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समस्त वकीलवर्गाने राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मोठ्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने केली.

यावेळी राज्य ग्राहक संरक्षण आयोगाचे खंडपीठ बेळगावात स्थापन व्हावे या मागणीसह मंत्री उमेश कत्ती यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी संतप्त वकिलांनी चन्नम्मा सर्कल येथे रास्ता रोको आंदोलनही केले. बराच काळ चाललेल्या या रास्ता रोकोमुळे चन्नम्मा चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वकिलांच्या या आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.Adv strike

दरम्यान, स्वतः पेशाने वकील असलेले बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आंदोलनकर्त्या वकिलांची भेट घेतली. तसेच मंत्री उमेश कत्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आंदोलन करणाऱ्या वकिलांच्या नेते मंडळींसोबत बोलणे करून दिले. त्यावेळी मंत्री उमेश कत्ती यांनी आश्वासन दिले असले तरी वकिलांनी चन्नम्मा सर्कल येथील आपले आंदोलन दुपार झाली तरी सुरू ठेवले होते.

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. सचिन शिवन्नावर, सरचिटणीस ॲड. गिरीराज पाटील व संयुक्त सचिव ॲड. बंटी कपाही यांच्या नेतृत्वाखाली आज छेडण्यात आलेल्या आंदोलनात ॲड. महांतेश पाटील, ॲड. अभिषेक उदोशी, ॲड. आदर्श पाटील, ॲड. इरफान ब्याल, ॲड. प्रभाकर पवार, ॲड. पुजा पाटील, ॲड. मारुती कामाण्णाचे शेकडो वकील सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.