बेळगाव महानगरपालिकेतील आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या भाषणाच्या अखेरीस ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिल्यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी अचंबित झाल्याची घटना आज बुधवारी मनपा कार्यालयात घडली. या प्रकारामुळे कन्नड संघटनांचा मात्र तिळपापड उडाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगाव महानगरपालिकेतील शिवाजी कळसेकर हे द्वितीय दर्जा सहाय्यक म्हणून सेवा बजावीत होते. आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले.
यानिमित्त महापालिका कार्यालयामध्ये बुधवारी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात कळसेकर यांनी प्रामाणिक व कर्तव्यदक्षतेने कार्य केले असल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभास महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना शिवाजी कळसेकर यांनी समयोचित विचार व्यक्त केले. आपल्या सेवाकाळात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि शेवटी आपल्या भाषणाची सांगता नकळत उस्फूर्तपणे जय महाराष्ट्र! या घोषणेने केली. त्यामुळे उपस्थित सर्वजणच कांही क्षण अचंबित झाले. मात्र नकळत ओघाओघाने हा प्रकार घडला असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांसह कोणीही ते फारसे मनावर घेतले नाही. तथापि कळसेकर यांच्या ‘जय महाराष्ट्र’ घोषणे संदर्भात माहिती मिळताच कन्नड संघटनांचा मात्र तिळपापड उडाला आहे.
बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कळसेकर यांनी केलेली घोषणा म्हणजे अक्षम्य अपराध आहे, तसेच हा राजद्रोह असल्याची प्रतिक्रिया चंदरगी यांनी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे शिवाजी कळसेकर यांना तात्काळ कारणे दाखवा नोटिस बजावण्यात यावी आणि निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा रोखण्यात याव्यात, अशी केविलवाणी मागणीही चंदरगी यांनी केली आहे.