कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामान्य प्रवेश परीक्षेला (सीईटी) आज गुरुवारपासून कडक पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 11,784 विद्यार्थी -विद्यार्थिनी या परीक्षेला बसले आहेत.
इंजीनियरिंग, आर्किटेक्टसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देताना सीईटी परीक्षेतील गुणवत्ता महत्त्वाची ठरते. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी उपाययोजना केली आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्रावर सीईटी पार पडणार आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 15 आणि चिकोडी येथील 14 केंद्रांचा समावेश आहे.
या केंद्रांच्या आवारासह परिसरात आज सकाळी परीक्षार्थींची गर्दी झाल्याचे पहावयास मिळत होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रारंभ झालेल्या सीईटी परीक्षेसाठी एका खोलीत फक्त 24 विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर शौचालय स्वच्छता, पिण्याचे पाण्याची सोय यासह इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे.
शहरातील संबंधित परीक्षा केंद्रांवर सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीला आज गुरुवारी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ झाला. परीक्षा केंद्रांवर शांतता कायम राहावी याकरिता केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहावी आणि बारावी परीक्षेप्रमाणेच आजपासून सुरू झालेल्या सीईटीप्रसंगी देखील हिजाब घालून परीक्षा केंद्रावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 11,784 विद्यार्थी -विद्यार्थिनी या परीक्षेला बसले आहेत. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6096 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 5688 विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश आहे. आजच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात जीवशास्त्र आणि दुपारी गणित विषयाचा पेपर आहे. सदर परीक्षा शनिवारपर्यंत चालणार आहे.