क्लब रोडवरील स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे म्हैस गटारात अडकून पडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून आम्ही संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी दिली आहे.
क्लब रोडवरील गटार बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराचे नांव कोमी चंद्रशेखर असे असून निष्काळजीपणाबद्दल त्याच्या विरुद्ध आम्ही कॅम्प पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस पुढील योग्य ती कार्यवाही करतील, असे प्रवीण बागेवाडी यांनी स्पष्ट केले आहे. क्लब रोडवरील गटारीचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्यामुळे गेल्या 8 जून रोजी सकाळी एक म्हैस गटारीत अडकून पडली होती.सर्वांत आधी बेळगाव live ने देखील ही बातमी प्रसिद्ध केली होती.
विचित्र अवस्थेत गटारीत अडकून पडलेल्या त्या म्हशीचे धूड बाहेर काढणे सोपे नसल्यामुळे अखेर त्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. चर्चेचा विषय झालेल्या या घटनेवरून प्राण्यांसाठी देखील स्मार्ट सिटीची अर्धवट कामे धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
बेळगाव शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची एकंदर अवस्था पाहता कांही मोजक्या अंगणवाडी, हॉस्पिटल्स आणि उद्यानांची कामे पूर्ण झाली असली तरी गटारी, ड्रेनेज आणि रस्ते ही अत्यावश्यक प्रमुख विकास कामे मात्र अर्धवट अवस्थेत पडून आहेत. ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केपीटीसीएल रोड हा शहरातील पहिला रस्ता स्मार्ट बनविण्यात आला असला तरी तो तांत्रिकदृष्ट्या अद्यापही सदोष आहे.
मंडोळी रस्त्याची तर चर्चा न केलेलीच बरी, स्मार्ट सिटी योजना अंमलात आल्यापासून म्हणजे गेल्या चार -पाच वर्षापासून हा रस्ता अर्धवट विकास झालेल्या अवस्थेत पडून आहे. निधी मंजूर होऊन देखील बहुतांश रस्त्यांवर पथदीप आणि ज्यांना फॅन्सी लाईट म्हंटले जाते ते बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित रस्त्यांवर विद्युतीकरणासाठी घालण्यात आलेल्या केबल जुन्या होऊन खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता जेंव्हा पथदीप बसवण्याचे काम हाती घेतले जाईल त्या वेळी पुन्हा एकदा नव्याने सर्व कामांचा श्रीगणेशा करावा लागणार आहे.
एकंदर स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत कोणती जबाबदारी आणि उत्तरदायित्व दिसून येत नाही. मंडोळी रोड तसेच अन्य कांही ठिकाणी स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी लि. विभाग विकास कामे अर्धवट ठेवून शहरवासीयांची आणखी किती सत्वपरीक्षा घेणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.