विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून तीनही मतदार संघामध्ये मिळून सुमारे 1 लाख 40 हजार मतदार असून हे मतदार निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या मतदारांपैकी 25 हजार मतदार कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघातील, 20 हजार पदवीधर मतदारसंघातील आणि 17 हजार मतदार कर्नाटक पश्चिम मतदार संघातील आहेत.
या वेळच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरली आहे. त्यासाठी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क वाढविला आहे.
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघात 12 उमेदवार तर पदवीधर मतदारसंघांमध्ये 11 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण 25 हजार 388 मतदार असून यामध्ये बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील 17,238 पुरुष आणि 8,150 महिला मतदारांचा समावेश आहे.
कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या 99 हजार 578 असून यामध्ये बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील 71,040 पुरुष आणि 28,554 महिला मतदारांचा समावेश आहे. कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या 17 हजार 973 असून यामध्ये कारवार, धारवाड हावेरी व गदग जिल्ह्यातील 10,983 पुरुष आणि 6,990 महिला मतदारांचा समावेश आहे. या पद्धतीने तिन्ही मतदारसंघांमधील सुमारे 1.40 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावून रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. सदर निवडणुकीसाठी 78 मतदार केंद्रे स्थापण्यात आली असून अन्य 4 अतिरिक्त केंद्रेही स्थापली जाणार आहेत. कोरोना नियमावलीचे पालन करून मतदान आणि मतमोजणी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून यासंदर्भात एक समितीही स्थापण्यात आली आहे.
या समितीकडून कोरोना नियमावलीचे नियोजन आणि कार्यवाही केली जाईल. निवडणूक विभागातर्फे मतदानाची तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली असली तरी मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या 13 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार असून त्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 ऐवजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.