गेल्या कांही महिन्यांपासून हवाई प्रवासासाठी बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत होणारी अभूतपूर्व वाढ गेल्या मे महिन्यात देखील कायम होती. नागपूर येथे नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेसह वाढलेल्या प्रगतीच्या वेगामुळे बेळगाव विमानतळावरील विमान सेवा आणि कार्गो वाहतुकीसह प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माहितीनुसार गेल्या मे महिन्यात बेळगाव विमानतळावरून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 7.5 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 37,0301 इतकी झाली आहे. याचा अर्थ एप्रिल 2022 च्या तुलनेत 2,428 प्रवासी वाढले आहेत. कार्गो वाहतूक 2 एमटी होती. गेल्या मे महिन्यात विमान फेर्यांमध्येही 8 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची संख्या 43 झाली आहे.
दरम्यान, गेल्या एप्रिल या केवळ एकाच महिन्यात 14 टक्के प्रवासी वाढ झाली होती. एप्रिल महिन्यात बेळगाव विमानतळावरून 30,689 प्रवाशांनी ये -जा केली होती. प्रवासी संख्येच्या बाबतीत बेळगाव विमानतळाने मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून बेंगलोर आणि मंगळूर पाठोपाठ आत्तापर्यंत राज्यातील आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
बेळगाव विमानतळावरून नवी दिल्ली, नागपूर, बंगळूर, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, अहमदाबाद, इंदोर, सुरत, तिरुपती व जोधपूर मार्गावर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरत, तिरुपती आणि पुणे मार्गे किशनगड, गुलबर्गा व नाशिकला बेळगाव लिंक सेवा उपलब्ध आहे.
या विमानतळावरून सध्या स्पाइस जेट, स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स आदी विमान कंपन्यांकडून प्रवासी सेवा दिली जात आहे.