बेडकिहाळ येथील कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या कला शाखेचे अधिष्ठाता आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. दुसरी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन बेडकिहाळ येथील बी. एस. संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयातील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहांमध्ये येत्या 26 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रा. डॉ. विनोद गायकवाड हे सुप्रसिद्ध साहित्यिक, चित्रकार आणि वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.
कादंबऱ्या 55, नाटक 6, समीक्षाग्रंथ 10 आणि 50 हून अधिक संशोधनपर लेख, अनेक सदरे व पुस्तकांना प्रस्तावना अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांची ‘साई’ ही कादंबरी कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, कोंकणी आदी भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. युगांत ही कादंबरी हिंदी, तामिळ भाषेत अनुवादित झाली आहे.
प्रा. गायकवाड यांच्या संपूर्ण कादंबऱ्यांवर नागनाथ आवळे यांनी गुलबर्गा विद्यापिठात पीएचडी आणि अमर कांबळे यांनी ‘साई’ व ‘युगान्त’ या दोनच कादंबऱ्यांवर कर्नाटक विद्यापीठ धारवाडमध्ये पीएचडी केली आहे.
विनोद गायकवाड यांच्या चरित्रात्मक कादंबरीवर संतोष मादाकाचे आणि समग्र वांग्मयावर सौ. पूजा कांबळे हे राणी चन्नम्मा विद्यापिठात पीएचडी करत आहेत. आता बेडकिहाळ येथील दुसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.