बेळगावात श्री अम्माभगवान मंदिराच्या उदघाटनानिमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.बेळगावातील सदाशिवनगरात श्री परमज्योति अम्माभगवान मंदिर उभारण्यात आले आहे.
या मंदिराच्या उदघाटनानिमित्त आज, रविवारी अम्माभगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकातुन सकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, आंबेडकर रोड या मार्गावरून सदाशिव नगरातील मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महिला भक्तांनी मंगल कलश घेऊन, हाती धर्मध्वज घेऊन भक्तिभावाने नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या पाठोपाठ सजवलेल्या बैलजोड्या, त्यानंतर पालखीमध्ये श्री परमज्योति अम्माभगवानांच्या पादुका तसेच अश्वरथामध्ये श्रीमुर्ती बसवण्यात आली होती.
पारंपरिक वाद्य मेळ्याने मिरवणुकीची शान आणखी वाढवली. पारंपरिक पोशाख परिधान करून, फेटे बांधून स्त्री-पुरुष भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते, बेळगावात अगदी छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या श्री अम्मा भगवान संप्रदायात आज हजारो भक्त सहभागी झाले आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांची श्रद्धा आणखीन वाढली आहे.
श्री अम्मा भगवान मंदिर उदघाटनानिमित्त रक्षा होम,गणपती होम आणि वास्तूशांती होम करण्यात आला.याबरोबरच जलदीक्षा, पादुका अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले.
एकंदर श्री अम्मा भगवान मंदिर उदघाटनानिमित्त बेळगावात आज उत्साहात भव्य अशी मिरवणूक पार पडली. यामध्ये भक्तांनी उत्साहात भाग घेऊन ती यशस्वी केली. मिरवणुकीनंतर मंदिराजवळ आयोजित महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.