केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात पर्यायाने मोदी सरकारच्या विरोधात खानापुरातील तमाम तरुण मंडळी, होतकरू तरुण, लष्कर भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या युवकांसह माजी सैनिकांनी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी तीव्र आंदोलन छेडले.
खानापुरातील मलाप्रभा मैदानावरून आज सकाळी सर्व आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत मोर्चाने शिवस्मारक चौकात पोहोचले. यावेळी आमदार डाॅ. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत होती.
त्यानंतर तिथून पुन्हा मोर्चाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये युवावर्ग शेकडोंच्या संख्येने सहभागी झाला होता.
सदर भव्य मोर्चा आणि आंदोलना दरम्यान कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलद कृती दल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी मोदी सरकारने अग्नीपथ योजनेद्वारे देश सेवा करणाऱ्या सैनिकांचा अपमान केला आहे. मोदी सरकार भ्रष्ट असून मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे असे सांगितले.