दीर्घकाळ चाललेल्या भाषिक लढ्यात समितीची पहिली फळी आजही लढत आहे. सीमा प्रश्नांसाठी 94 वर्षाचे पितामह सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी आपल्या वयाचे भान न राखता मुंबईची वारी करण्यासाठी गेले आणि तज्ञ समितीच्या बैठकीत त्यांनी आपले मत नोंदवले.
समिती जगली,समिती टिकली, समिती वाढली आणि आजही 70 वर्षा नंतर समिती लढत आहे ते अश्या वकील राम आपटे सारख्यांच्या जीवावर… वय आता 94 म्हणून ते हरले नाहीत की थांबले नाहीत!!
2004 साली सुप्रीम कोर्टातील दावा दाखल करताना 80 वर्षाचे असणारे राम आपटे ज्या उत्साहाने मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करत होते,त्याच उत्साहाने आज 94 व्या वर्षीही आज मुंबई येथे तज्ज्ञ समितीच्या बैठकीसाठी दाखल झाले.
खिंड लढवली जाते ती अशाच बाजीप्रभू कडून. अंगावर घाव झेलून तोफांच्या आवाजाची प्रतीक्षा करत. सीमाप्रश्नाची ही खिंड राम आपटे नावाच्या बाजीप्रभू कडून आजही लढवली जात आहे. मुंबईच्या दिल्लीच्या खिंडीत सीमाप्रश्नासाठी उभा राहिलेला हा बाजीप्रभू आज तितक्या शर्तीने लढत आहे.
राम आपटे यांचा सीमाप्रश्नाचा लढ्यातला सहभाग हा बॅरिस्टर नाथ पै यांच्या बरोबरीने चालू झाला. अनेक काळ त्यांनी या आंदोलनात कारावास देखील भोगला आहे. प्रजा समाजवादी पक्षाचे एस. एम. जोशी,ना.ग. गोरे आणि समितीचे बळवंतराव सायनाक यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं आहे.
सीमाप्रश्नाचा दावा दाखल केला गेला त्यावेळी त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे गोळा करणे, त्याची मांडणी करणं, त्याच्या साठी लागणारे पुरावे गोळा करणे हे सगळं काम खूप निष्ठेने राम आपटे सरांनी केलेले आहे. त्या दाव्याचा पायाच त्यांनी रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.अशा या सीमातपस्वाच्या कार्याला लवकरच यश यावे अशी सीमावर्ती भागातून मराठी लोकांची आशा आहे.
एक दोन वर्ष समितीत काम करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना राम आपटे यांचं सह्याद्री एवढे मोठे कार्य बघून काहीतरी शिकण्यासारखे आहे.