विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे एड मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड मुकुंद परब यांच्या निधना निमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुकुंद परब यांचा फोटो ठेवण्यात आला होता.
प्रारंभी आदर्श सोसायटीचे चेअरमन श्री दिगंबर राऊळ व व्यासपीठावरील सर्वानि पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व दिपप्रज्वलन केले.
पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विविध संस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्ग सोसायटीचे मार्गदर्शक महादेव सावंत म्हणाले की, मुकुंदराव अचानक निघून गेल्याने आम्ही एका मार्गदर्शकास मुकलो आहोत. आमच्या सोसायटीचे उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
एक निष्णात वकील महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठे कार्य केलेल्या परब यांना बेळगावकर कायम स्मरणात ठेवतील अशा शब्दात धनश्री सोसायटीचे संस्थापक कॅप्टन कानडीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण म्हणाले की, परब वकिलांच्या निधनामुळे संपूर्ण सीमाभाग दुःख सागरात बुडालेला आहे.एक शांत, संयमी व कायम हसतमुख राहणाऱ्या व्यक्तीस आपण मुकलो आहोत. मराठी वकिलांची संघटना स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
अनगोळ विकास मंडळाचे वसंत दांडेकर म्हणाले की, सीमाप्रश्न सुटावा ही मुकुंद परब यांची तीव्र इच्छा होती. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा पिंड चळवळीचा होता.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्यावतीने ईश्वर लगाडे म्हणाले की, विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य न विसरण्यासारखे आहे एका अत्यंत संयमी शांत व्यक्तीला आपण मुकलो आहोत
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले की ,मुकुंदराव हे समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते वकिली पेशापेक्षा म य समिति च्या यशस्वीतेसाठी त्यांनी आपला अधिक वेळ दिला. समितीच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केलेले कार्य हे न विसरता येण्यासारखी आहे त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी समोर ठेवण्यासारखा आहे
मुक्तांगण विद्यालयाच्या प्राचार्य सविता जे के म्हणाल्या की, परब सरांच्या कडून शिकण्यासारखे बरेच काही होते
लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब म्हणाले की ,दादांच्या बद्दल प्रत्येक जण ते एक निस्वार्थी, प्रामाणिक व संयमी व्यक्ती होते असेच बोलतात .त्यांच्यापासूनच आम्हाला निस्वार्थीपणे व त्यागी वृत्तीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. बेळगाव पायोनियर बँक, मराठा बँक आणि अनेक सोसायट्यां प्यनल वर ते होते .सिंधुदुर्ग रहिवासी संघ गावडे गुरुजी व आर के सावंत यांच्या सहकार्याने दादा नी सुरु केला त्यामुळेच आम्ही सिंधुदुर्गातील कार्यकर्ते इथं एकत्र येऊन काम करीत आहोत त्यांचा आदर्श घेऊन मार्गस्थ होऊया
आदर्श सोसायटीचे चेअरमन दिगंबर राउळ म्हणाले की, ते निघून गेले त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता ,आदर्श सोसायटी व मुक्तांगण विद्यालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने आम्ही एका ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकलो आहोत .त्यांच्या निधनाने आमची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
त्यानंतर सर्वानी दोन मिनिटे उभा राहून श्रद्धांजली वाहिली. सुरुवातीला सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने फुलाच्या पाकळ्या अर्पण करून श्रद्धांजली वाहिली .या प्रसंगी सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी, आदर्श सोसायटी व सिंधुदुर्ग सोसायटीचे चे सर्व संचालक, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते बी ये येतोजी यांच्यासह मुक्तांगणच्या शिक्षक, वकील वर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते