मनुष्याच्या कंठामध्ये या श्री कृष्ण मूर्तीच्या दर्शनाने आश्चर्य वाटते ना? मात्र वस्तुस्थिती कांही वेगळीच असून केएलईच्या डॉक्टरांना एकाच्या घशात अडकलेली ही श्री कृष्णाची मूर्ती शस्त्रक्रिया करून बाहेर काढावी लागली आहे.
एका 45 वर्षीय व्यक्तीने देवाचे तीर्थ प्राशन करताना अनावधानाने त्यासोबत लोह धातूची श्रीकृष्णाची छोटी मूर्तीही गिळली. तिर्थासमवेत गिळलेली देवाची मूर्ती कंठामध्ये अर्थात घशामध्ये अडकल्याने सूज येऊन त्या व्यक्तीला वेदना होऊ लागल्या. तेंव्हा आपण काय गिळले याची कल्पना नसलेल्या त्या व्यक्तीने उपचारासाठी आपल्या डॉक्टरांकडे धाव घेतली.
त्यावेळी डॉक्टरांनी त्याला घशाचा एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. तेंव्हा एक्स-रे रिपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीच्या घशामध्ये श्रीकृष्णाची छोटी मूर्ती अडकली असल्याचे निदर्शनास आले. घशात अडकलेले मूर्ती सहजासहजी काढता येणे शक्य नसल्यामुळे त्या व्यक्तीला अधिक उपचारासाठी केएलई डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
श्रीकृष्णाची मूर्ती त्या व्यक्तीच्या अन्ननलिकेमध्ये अडकली असल्यामुळे केएलई हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाच्या तज्ञांनी इंडॉस्कॉपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून ती मूर्ती बाहेर काढली.
ईएनटी विभागाच्या डॉ. प्रीती हजारे, डॉ विनिता मटगुडमठ, भूलतज्ञ डॉ. चैतन्य कामत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या सर्वांचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकरराव कोरे, प्रशासकीय मंडळाचे सदस्य आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी अभिनंदन केले आहे.