मालमत्तेच्या वादातून घरात घुसलेल्या टोळक्याने तलवारीने प्राणघातक हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील कॅम्प परिसरामध्ये घडली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.
कॅम्प परिसरात काल सोमवारी सायंकाळी ही तलवार हल्ल्याची थरारक घटना घडली. खानापूर रोड रस्त्यावरील दोन कुटुंबातील सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाचे पर्यवसान तलवारीने हल्ला करून तिघाजणांना गंभीर जखमी करण्यामध्ये झाले. मिळालेल्या माहितीनुसार संतोष लोहार पवन, लोहार आणि त्यांच्या साथीदारांनी विनायक लोहार, राजू लोहार आणि रॉकी फ्रान्सिस यांच्यावर घरात घुसून तलवारीने प्राणघातक हल्ला केला.
सदर हल्ल्यात विनायक, राजू व रॉकी हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना एका जखमीच्या पत्नीने सांगितले की, माझे पती भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर पाठीमागून तलवारीने हल्ला करण्यात आला. माझ्या नणदेच्या पतीचे भांडण असल्यामुळे माझे पती भांडण सोडविण्यास गेले होते. तलवार हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर घटनेनंतर घरातून फरारी झाले आहेत. तेंव्हा पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करून आम्हाला या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा, असे संबंधित महिला म्हणाली. दरम्यान तलवार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिघाही जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी हल्लेखोरांना गजाआड करण्यासाठी तपास कार्य हाती घेतले आहे.