देसुर रेल्वे स्थानकानजीकच्या आरसीएफ -डीएपी गोदामातून सुमारे 12 लाख रुपये किंमतीच्या रासायनिक खताची तब्बल 900 पोती चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या धाडसी चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
देसुर रेल्वे स्थानकानजीकच्या आरसीएफ -डीएपी गोदामामध्ये रासायनिक खताच्या पोत्यांची साठवणूक केली जाते. रविवारी रात्री हे गोदाम फोडून चोरट्यांनी 900 पोती खत पळविले आहे.
हा प्रकार काल सोमवारी सकाळी निदर्शनास येताच गोदामाचे व्यवस्थापक शिवाजी जाधव यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली.
गोदामातील 900 पोती रासायनिक खत चोरण्यासाठी वाहनांचा वापर केल्याचे दिसून आले आहे. चोरीचा छडा लावण्यासाठी गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले जात आहे.
गोदामातून तब्बल 900 पोती वाहनात भरणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी कांही तास निश्चितपणे लागतात, असे असताना सदर चोरीचा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.