राज्यातील 1995 नंतरच्या शाळा व महाविद्यालयांना अनुदान मंजूर करण्याची मागणी करता कर्नाटक राज्य विनाअनुदानित शाळा आणि कॉलेज प्रशासक मंडळ, कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाती घेण्यात आलेले बेमुदत साखळी आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू होते.
राज्यातील 1995 नंतरच्या विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर करण्याची मागणी आहे. त्यासाठी कित्येक वर्षापासून तोंडाला पाने पुसली जात आहेत. माजी शिक्षण मंत्री सुरेशकुमार आणि विद्यमान शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांच्याकडूनही केवळ आश्वासने मिळत आहेत.
त्यामुळे विनाअनुदानित शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात साखळी उपोषण सुरू आहे. या बेमुदत आंदोलनातील आंदोलनकर्त्यांची आमदार अरुण शहापूर आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी भेट घेतली असून सरकारच्या पातळीवर विषय उचलून धरण्याची ग्वाही दिली आहे.
सदर बेमुदत साखळी आंदोलनात 8 शिक्षक उपोषणाला बसले आहेत त्यापैकी तिघांची प्रकृती खालावल्याने काल सायंकाळी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष जे. सी. शिवाप्पा, मुख्य सचिव शीतल मालगावे, खजिनदार बी कुळीगुड्ड, एस. एस. मठद, रामू गुणवाड, टी. पी. बेळगावकर, मारुती अंजनी, सुरेश कांबळे, मारुती कंग्राळकर, कविता खणगावकर, राजश्री परब, विणा हिरेमठ आदींचा सहभाग आहे.