यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ एन. कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक पैकीच्या पैकी गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबरच राज्यात टॉपर बनला आहे.
शहरातील टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण संपादन केले आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील ज्या 143 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत त्यात स्थान मिळवताना अमोघने स्वतःसह आपल्या शाळेचे आणि बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे.
देव रेसिडेन्सी भाग्यनगर चौथा क्रॉस येथे वास्तव्यास असणारे जीएसएस कॉलेजचे गणित विषयाचे प्राध्यापक नागसुरेश कौशिकी यांचा अमोघ चिरंजीव आहे. अमोलची आई जयश्री या गृहिणी आहेत. अमोल कोशिक याला एम. व्ही. हेरवाडकर शाळेचे शिक्षक अरुण पाटील परिमळा जोशी, वत्सला टीचर आणि वनिता टीचर यांच्यासह विशेष करून विद्या क्लासेस या शिकवणी वर्गाचे शिक्षक दीपक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ठरवून अभ्यास केला नव्हता. तथापि परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी पहिल्यापासून तयारी सुरू केली होती. परीक्षेतील यशामुळे मला खूप आनंद होण्याबरोबरच समाधान वाटत आहे, असे अमोघ याने बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले. माझ्या यशात माझ्या आई-वडिलांसह सर्व शिक्षकांचा विशेष करून माझ्या शिकवणी क्लासचे शिक्षक दीपक शिंदे यांचा मोठा वाटा आहे. भविष्यात काय बनायचे आहे हे मी आत्ता ठरवलेले नाही. सध्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे असे सांगून मन लावून अभ्यास करत राहा. जीवनात एक चांगली व्यक्ती बना. तुम्ही चांगले असाल तर सर्वकाही आपोआप चांगले होते, असा संदेश अमोलने त्याच्या प्रमाणे दहावीत यश संपादन करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
प्रा. नागसुरेश कौशिकी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अमोघ हा मुळातच एक उत्तम विद्यार्थी आहे. त्याच्या यशाचे पहिले श्रेय त्याच्या आईला जाते. त्याचप्रमाणे त्याच्या शिक्षकांनीही त्याला मोलाचे मार्गदर्शन केले. अमोघला घडवण्यामध्ये शिक्षकवर्गाचा मोठा वाटा आहे. माझ्या मुलाला मी पूर्ण स्वातंत्र्य दिले असले तरी त्याच्यावर माझे नेहमी लक्ष असायचे असे सांगून मुलांच्या शैक्षणिक जीवनात प्रामुख्याने आई आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांवर अभ्यासाची जबरदस्ती करू नये. मात्र त्याच वेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काय करत आहेत? योग्य मार्गावर आहेत ना? यावर मात्र बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
मुलांना मोकळीक देण्याबरोबरच त्यांच्यावर काही बंधनेही घातली पाहिजेत, असे प्रा. नागसुरेश यांनी स्पष्ट केले. कौशिक कुटुंब हे मूळचे म्हैसूरचे असून गेल्या कित्येक वर्षापासून ते बेळगावात स्थायिक झाले आहेत. दरम्यान दहावीच्या परीक्षेतील घवघवीत यशाबद्दल अमोल कौशिकवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.