मराठा को -ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे वैशिष्ट्य म्हणजे ही बँक कधीही स्वतःच्या नफ्याकडे न पाहता भागधारकांसह मराठी भाषा आणि बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आजतागायत कार्य करत आली असून या बँकेचा संचालक असल्याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया मराठा बँकेचे संचालक व माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी व्यक्त केली.
मराठा बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाइव्हशी बोलताना सुनील अष्टेकर म्हणाले की, येत्या 11 मे रोजी आमच्या बँकेचा अमृतमहोत्सवी सोहळा होणार आहे. या सोहळ्यास देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत, हे आमच्यासाठी भूषणावह आहे. गेल्या 80 वर्षांपूर्वी आमच्या वडीलधाऱ्यांनी या बँकेची स्थापना केली. तत्कालीन काळात बहुजन समाजाच्या हितासाठी झटणारी उत्तर कर्नाटकातील ही एकमेव बँक होती. ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास आणि कामकाजातील पारदर्शकता यामुळे आज आमची बँक यशस्वी घोडदौड करत आहे. याचे संपूर्ण श्रेय बँकेचे सभासद आणि ग्राहकांना जाते.
तब्बल 80 वर्षानंतर आज देखील बहुजन समाजातील सर्व थरातील लोकांना या बँकेचा आधार वाटतो हे या बँकेचे मोठे यश आहे. भाजीविक्रेते, ऑटोरिक्षा चालक, बांधकाम क्षेत्रातील गवंडी वगैरे तळागाळातील लोक, बेरोजगार तरुण यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी मराठा बँक नेहमी अग्रेसर असते. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे या बँकेने कधीही स्वतःच्या नफाकडे जास्त लक्ष न देता भागधारकांचे मराठी भाषा आणि बहुजन समाजाच्या हित जोपासणे यावर अधिक भर दिला आहे, असे अष्टेकर यांनी सांगितले.
कुद्रेमनी, मुतगा आदी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश शिक्षणाचे साहित्य आदी स्वरूपातील शैक्षणिक मदत बँकेने केली आहे. खरंतर सरकारची जबाबदारी आहे ती स्वतः पार पडताना मराठा बँकेने बर्याचशा शाळांच्या खोल्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. मराठा बँकेला महाराष्ट्र व कर्नाटकातील दिग्गज नेत्यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत स्पर्धात्मक युग लक्षात घेऊन बँकेचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे.
त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील सर्व आधुनिक सेवा आजच्या घडीला मराठा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. भविष्यात युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आणि शाखांचे जाळे वाढवून आणखी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे मराठा बँकेचे संचालक सुनील मल्लापा अष्टेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना बेळगावच्या माजी उपमहापौर आणि मराठा बँकेच्या संचालिका रेणू सुहास किल्लेकर यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून येत्या बुधवार दि. 11 मे रोजी आयोजित मराठा को-ऑप. बँक लि.च्या अमृतमहोत्सवी समारंभास सर्व सभासदांसह हितचिंतक आणि समस्त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन केले.