उपेक्षित लोकांना सन्मानाने उभे करण्याचा सहकाराचा जो मुलमंत्र, मूलभूत तत्व आहे. त्याची पूर्तता आजच्या पिढीने केल्यास हा एक इतिहास होईल आणि बेळगावातील पिढी या इतिहासाचा एक भाग व्हावी, अशी अपेक्षा देशाचे माजी कृषिमंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.
शहरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृतमहोत्सवी समारंभ आज बुधवारी सकाळी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बोलत होते.
आपल्या देशाला सहकार चळवळीचा जवळपास सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कालावधी अनेक खाजगी बँका राष्ट्रीयीकृत केल्या. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी बँका आणि नागरी पतसंस्थांचा मोठा वाटा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे योगदान देखील आहे. राष्ट्रीयीकृत बँका एका विशिष्ट वर्गातील आणि आर्थिक स्तरातील लोकांची अधिक आत्मीयतेने काम करतात.
याउलट उपेक्षित माणसाला मदत करणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे काम खऱ्या अर्थाने सहकारी बँका आणि नागरी पतसंस्था करतात. मराठा बँक तर गेल्या 75 वर्षांपासून हे कार्य करत आहे, असे पवार यांनी सांगितले.
बँक कशी असावी याची एक नाडीपरीक्षा आहे ती म्हणजे कर्ज व त्याची वसुली याबाबतचे जे मार्गदर्शक तत्व आहे, ज्याला एनएफए म्हणतात ते जर योग्य असेल तर त्या बँकेचे अर्थकारण अतिशय उत्तम आहे असे समजावे. यासंदर्भात जुन्या पिढीतील मंडळींनी घालून दिलेली सूत्रे मराठा बँकेची आजची पिढी पाळत आहे त्यामुळेच बँकेचा उत्कर्ष होत आहे. जुन्या काळातील दृष्ट्या मंडळींचा आदर्श येथील आजची पिढी जोपासत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.
बेळगाव शहर परिसर हा कृषिप्रधान म्हणून ओळखला जात असला तरी या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक लहान -मोठे उद्योग धंदे आहेत. येथील युवापिढी यामध्ये मोठ्या प्रमाणात रस घेते. त्यामुळे छोट्या-मोठ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. सुटाबुटातील लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा कष्ट करून कांहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि ग्रामीण भागातील लोकांवर सहकारी बँकांनी जास्त विश्वास ठेवावा. त्यांच्या पाठीशी उभे राहावे. शेतकरी अथवा उपेक्षित उद्योजकांना आपण कशी मदत करू शकतो याचा विचार त्यांनी करावा. त्याचप्रमाणे सभासद व कर्जदारांनीही वेळेवर पैशाची परतफेड करणे हे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावे.
जगातील चौथ्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी हुंडाईचे संस्थापक चांग से यंग हे माझे मित्र आहेत. त्यांनी ट्रकची जेसी बनवण्याच्या कामापासून आपल्या उद्योगाची सुरुवात केली. आज ते जगातील चौथ्या क्रमांकाचे वाहन उत्पादक उद्योजक आहेत. त्यांचा आदर्श बेळगावातील उद्योजकांनी घ्यावा. कोरोनामुळे गेली दोन वर्षे उद्योगधंद्यांना वाईट गेली. परंतु त्याची चिंता करून चालणार नाही. आता त्यावर मात कशी करायची हा विचार केला पाहिजे आणि मात करायची असेल तर आपला व्यवहार कसा असला पाहिजे आणि त्यासाठी मराठा बँक आपल्या पाठीशी कशी खंबीर उभी राहील याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. ही खबरदारी घेतली तर माझी खात्री आहे की उपेक्षित लोकांना सन्मानाने उभे करण्याचा सहकाराचा जो मंत्र, मूलभूत तत्व आहे, त्याची पूर्तता आजच्या पिढीने केल्यास हा एक इतिहास होईल आणि बेळगावातील पिढी या इतिहासाचा एक भाग व्हावी, अशी अपेक्षा शेवटी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, व्हा. चेअरमन नीना काकतकर, संचालक बाळाराम पाटील, दिपक दळवी, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव होनगेकर, बाबुराव पाटील, विश्वनाथ उर्फ शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, सशिलकुमार खोकाटे, रेणू किल्लेकर, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक आणि बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते. प्रारंभी माननीय शरद पवार यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून आणि दीपप्रज्वलन करून अमृत महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन दिगंबर पवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय करून देताना बँकेचे संचालक दीपक दळवी यांनी सीमाप्रश्न सोडविण्यासंदर्भात शरद पवार हे सीमावासीयाचे आशा स्थान असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी च्या शैक्षणिक सोयी सवलती बंद केले आहेत त्या पूर्ववत सुरू केल्या जाव्यात किमान स्पर्धात्मक परीक्षेत अडचणी येऊ नयेत याची दखल घेतली जावी अशी मागणी केली. सीमावासीयांच्या अडचणीत आहे ती अडचण दूर होईपर्यंत महाराष्ट्र सरकारने या भागातील मराठी माणसासाठीच्या आपल्या सोयी सवलती सुरूच ठेवाव्यात असेही दिपक दळवी म्हणाले.
प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचयानंतर माननीय शरद पवार यांचा बँकेतर्फे चेअरमन दिगंबर पवार, दीपक दळवी, बाळासाहेब काकतकर आणि कृष्णा मेणसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समारंभाचे अध्यक्ष कॉ. मेणसे यांचाही संचालक बाळाराम पाटील व लक्ष्मण होनगेकर यांनी शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी मराठा को-ऑप. बँकेबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मराठा बँकेच्या अमृतमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या ज्येष्ठ सभासदांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लक्ष्मण होनगेकर, निंगोजी हुद्दार, नागेश झेगरुचे, नागेंद्र हैबती, शिवबाळ खोकाटे व नौशाद सुतकट्टी या ज्येष्ठ सभासदांचा शरद पवार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अमृतमहोत्सवी सोहळ्यास बँकेचे माजी संचालक, भागधारक, सभासद, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
अमृत महोत्सवासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे समारंभस्थळी आगमन होताच त्यांचे तुतारीच्या ललकारीत उस्फुर्त आणि भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शरद पवार हे भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी ‘बेळगाव-कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेने परिसर दणाणून सोडला. त्यावेळी सीमावासीयांबद्दल अतिशय आत्मीयता असणाऱ्या शरद पवार यांनी मिस्किलपणे आता मी बोलू का? परवानगी आहे का? अशी विचारणा करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे समारंभ ठिकाणचे वातावरण अधिकच हलकेफुलके झाले.