बहुसंख्येने असणारा मराठा समाज आपल्या एकतेसाठी, आपल्या समस्येसाठी तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी पुन्हा एकदा एकसंघ होऊन झगडण्यास सज्ज झाला आहे. निमित्त आहे मराठा समाजाचे गुरू श्री मंजुनाथ स्वामी यांच्या सत्काराचे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह अनेक भागातून मराठा समाजातील दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या श्री शिवजयंती उत्सव मिरवणुकीत देखील लाखो मराठा समाजातील शिवभक्तांनी गर्दी केली होती. अशीच गर्दी या कार्यक्रमात देखील दिसून येणार आहे. हे एक शिवकार्य असून यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्त संघटित झालेले पाहायला मिळणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या औचित्याने 15 मे रोजी शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर एकत्रित येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शोभायात्रेत वाद्यवृंद, झान्झपथक, ढोलपथक, भजनी मंडळांचाही समावेश असणार आहे.
सकल मराठा समाजाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या दैदीप्यमान कार्यक्रमात प्रत्येकाने उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सभा, बैठका होत असून हा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत लक्षणीय ठरणार असल्याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. तालुक्यातील येळ्ळूर या गावात या कार्यक्रमासंदर्भात पहिली बैठक पार पडली असून मराठा समाजात चैतन्य निर्माण झाले आहे.
बेळगावमधील शिवजयंती उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मोफत मेकअपची सोय करण्यात आली होती. यावेळी बेळगावमधील अनेक मंडळांच्या कलाकारांनि या सुविधेचा लाभ घेतला. सध्या बेळगावमध्ये सकल मराठा समाजाच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे.