बेळगाव शहर आणि उपनगरातील समस्त मुस्लिम बांधवांनी आज मंगळवारी रमजान ईद सण अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने साजरा केला. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे कार्यक्रम शांततेत पार पडले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईद सण घरगुती साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्याचप्रमाणे सामूहिक नमाज पठणावर देखील बंदी होती. मात्र यंदा कोरोना संदर्भातील सर्व नियम मागे घेण्यात आले असल्यामुळे शहरातील मुस्लिम बांधवांकडून रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भक्तीभावाने रोजे पाळले जात आहेत. देशभरामध्ये आज रमजान ईद निमित्त सकाळी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहरांमध्ये देखील अंजुमन इदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात श्रद्धेने पार पडला. ईद निमित्त आज सकाळपासूनच शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव नवे पोषाख घालून उत्साहाने घराबाहेर पडल्याचे पहावयास मिळत होते. अबालवृद्ध मोठ्या आनंदाने एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देताना दिसत होता. इदगा मैदानासह शहर उपनगरातील प्रार्थना स्थळांच्या ठिकाणीदेखील सामूहिक नमाज पठाण संपन्न झाले.
या संदर्भात बोलताना मुफ्ती अब्दुल काजी म्हणाले की, देशात सुख शांती आणि सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी अल्लाकडे आम्ही सर्वांनी भक्तीभावाने प्रार्थना केली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाने आपणा सर्वांना चांगला धडा शिकवला आहे.
तेंव्हा यापुढे प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे सर्वांनी एकमेकाशी बंधुभावाने राहून सलोख्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे असे सांगून एकमेकांच्या जाती धर्मांना कमी लेखणे बंद झाले पाहिजे, असेही मुफ्ती अब्दुल काझी यांनी स्पष्ट केले.