राजहंस देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी समितीच्या अध्यक्ष व सेक्रेटरींनी मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असून त्याची चौकशी करून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत विकास काम करू दिले जाणार नाही असा पवित्रा घेत संतप्त राजहंसगड ग्रामस्थांनी गडावर आंदोलन छेडून तेथील शिवमुर्तीचे विकास काम बंद पाडल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली.
याबाबतची माहिती अशी की, राजहंसगड देवस्थान व किल्ला अभिवृद्धी कमिटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांनी विकास काम करताना उपाध्यक्षांसह कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता ऑडिट रिपोर्ट वगैरे बनावट करून मोठी अफरातफर केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या गैरव्यवहार -अफरातफरीची कुणकुण लागताच राजहंसगड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अन्य अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली होती. ग्रामस्थांनी एआर ऑफिसमध्ये केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी अधिकारी आज सोमवारी राजहंसगड गावाला भेट देऊन चौकशी करणार होते.
मात्र सदर अधिकारी आज दुपारपर्यंत गावाकडे न फिरकल्यामुळे यामागे काहीतरी काळंबेर असावे, कोणाच्या तरी दबावामुळे अधिकारी आले नसावेत, असा संशय घेऊन संतप्त ग्रामस्थांनी थेट राजहंस गडावर जाऊन येथे सुरू असलेले छ. शिवाजी महाराज यांच्या या मूर्तीचे विकास काम बंद पाडले. तसेच जोपर्यंत राजहंसगड देवस्थान व किल्ला अभिवृद्धी कमिटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीच्या गैरकारभाराची चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत विकास काम सुरू केली जाऊ नये. जर हे काम सुरू केल्यास राजहंस गडावर आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
आपल्या आंदोलनासंदर्भात गावातील प्रमुख नागरिक सिद्धाप्पा पवार, देवस्थानाचे पुजारी शिवानंद मठपती, सिद्धाप्पा नाईक व शंकर नागवडेकर यांनी बेळगाव लाईव्हला अधिक माहिती दिली. राजहंसगड ग्रामस्थांच्या आंदोलनाप्रसंगी लक्ष्मण थोरवत, हणमंत नावगेकर, सुरेश थोरवत, बाळू इंगळे, सिद्धाप्पा नाईक, बसवंत पवार, शंकर नागवडेकर, शिवानंद मठपती आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.