यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या एसएसएलसी (दहावी) बॅचमधील गणेश परसराम गोडसे हा वार्षिक परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरला आहे. परंतु दुर्दैवाने त्याला या दरम्यान रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. सध्या त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गणेश गोडसे याची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी येणारा खर्च त्याच्या पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेचे आजी विद्यार्थी, शिक्षक व शाळा सुधारणा समिती या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी मदत करणार आहे.
तरी मराठी विद्यानिकेतनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी आपल्या परीने शक्य असेल तितकी आर्थिक मदत करावी. आपण आपली मदत 100 रुपयापासून ते शक्य असेल तितकी करावी, असे आवाहन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे यांनी केले आहे.
इच्छुकांनी आपली मदत पुढे दिलेल्या बँक खात्यावर जमा करून सहकार्य करावे. खातेदाराचे नांव : प्रिन्सिपल मराठी विद्यानिकेतन, खाते क्र. 1233000100160285, बँकेचे नांव : पंजाब नॅशनल बँक, आयएफएससी कोड : पीयुएनबी 0123300.