पदवीपूर्व द्वितीय वर्षाची म्हणजे बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आता पेपर तपासणीला सुरुवात होणार असून येत्या मंगळवार दि. 24 मे पासून बेळगाव शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.
दहावीच्या निकालानंतर आता शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचा निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेपर तपासणीचे काम कशा प्रकारे करावे याबद्दलचे प्रशिक्षण प्राध्यापकांना देण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम सुरु होणार असून यासाठी विविध जिल्ह्यातील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने पेपर तपासणीचे काम अनेक दिवस चालण्याची शक्यता आहे.
पदवीपूर्व विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी नागराज व्ही. यांनी शहरातील 8 केंद्रांवर बारावीच्या पेपर तपासणीचे काम सुरू होणार असल्याचे सांगून यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित प्राध्यापकांना करण्यात आल्या आहेत. पेपर तपासणीचे काम लवकर पूर्ण होऊन वेळेत निकाल जाहीर व्हावा यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे स्पष्ट केले.
कोरोनामुळे गेल्या वर्षी विलंबाने पदवीपूर्व महाविद्यालय सुरू झाली होती. त्यामुळे यावेळी लवकर निकाल लागावा यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदर शिक्षण खात्याची तयारी लक्षात घेता जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.