कोरोना नियंत्रणात आल्यानंतर अलीकडच्या काळात वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ बेळगाव विभागाच्या महसुलात वाढ होत असून गेल्या 16 मेपर्यंत 6.14 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. कोरोनानंतर महसूल प्राप्तीचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
कोरोनामुळे 2 वर्षे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या महसुलावर परिणाम झाला होता. या काळात रोज लाखोंचा फटका सोसावा लागला. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यामुळे ठप्प झालेले जनजीवन कांही महिन्यांपासून पूर्वपदावर आले आहे. खाजगी वाहनांबरोबर वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसना देखील गर्दी होत आहे. शहरांतर्गत, ग्रामीण भागात आणि शहराबाहेर धावणाऱ्या बसेस पूर्ण क्षमतेने धावताना दिसत आहेत.
प्रवाशांच्या गर्दीमुळे कांही महिन्यात सरासरी 5.22 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तथापि मे महिन्यात आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. गेल्या 16 मेपर्यंत आकडा 6.14 कोटी रुपये झाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे नियंत्रक, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांच्यासह महामंडळाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्यदक्षपणा व सहकार्यामुळेच महसुलात वृद्धी झाल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी म्हंटले आहे. तसेच याबद्दल त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.