बेळगावचा युवा चित्रपट निर्माता हर्षद नलावडे याच्या ‘फाॅलोवर’ या चित्रपटाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड केली आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बेळगावचा हर्षद नलावडे हा पुणे येथील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया अँड कमुनिकेशन या संस्थेतून 2012 साली पदवीधर झाला आहे. मुंबई येथून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करताना त्याने प्रारंभी लेखक आणि लघु चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर मोठ्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केले. हर्षदचा पहिला चित्रपट हा लोकवर्गणीतून तयार करण्यात आला होता हे विशेष होय.
हर्षद नलावडे याने तयार केलेला ‘फॉलोवर’ हा चित्रपट बेळगाव शहरातील एका पत्रकाराच्या सभोवती फिरतो. याखेरीज या चित्रपटात दोन समुदायातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावकरांसाठी हा चित्रपट विशेष असणार आहे.
‘मला माझा चित्रपट बेळगावच्या स्थानिक बोलीभाषेत बनवायचा होता. यासाठी या चित्रपटात मी स्थानिक कलाकारांनाच अधिक प्राधान्य दिले आहे.
यामुळे चित्रपट प्रभावी होण्यास मदत झाली’, असे हर्षद नलावडे याने सांगितले. त्याचप्रमाणे सदर चित्रपट परिपूर्ण करण्यासाठी डब्ल्यूआयपी लॅबचे मोठे सहकार्य लाभल्याचे ही हर्षद याने स्पष्ट केले.
Yes