महापालिका निवडणूक होऊन नऊ महिने उलटले तरी आपल्या प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज सोमवारी सकाळी मनपा आरोग्य विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारून श्री बसवेश्वर सर्कल खासबाग येथील नाल्याची समस्या त्वरित निकालात काढण्याची मागणी केली.
बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (एइई) कलादगी त्यांनी आज सोमवारी सकाळी प्रभाग क्र. 27 ला भेट दिली. यावेळी महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी आपल्या प्रभागकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नगरसेवक रवी साळुंखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कलादगी यांनी मी बऱ्याचदा येऊन गेलो आहे. मात्र आपली भेट होऊ शकली नाही असे स्पष्टीकरण दिले. तेंव्हा साळुंखे यांनी जर आला होता तर लोकप्रतिनिधी या नात्याने मला का भेटला नाहीत? लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसेल तर विकास कमी कशी होणार? असा सवाल केला. त्यावेळी अभियंता कलादगी निरुत्तर झाले.
यावेळी आपल्या प्रभागाची मनपा अधिकाऱ्यांना किती माहिती आहे याची शहानिशा करण्यासाठी नगरसेवक साळुंखे यांनी प्रभाग क्र. 27 मध्ये लोकसंख्या किती आहे? घरे किती आहेत? कमर्शिअल दुकान किती आहेत. कच्चे व पक्के नाले किती आहेत? जनसंख्येनुसार किती मनपा कामगार या प्रभागांमध्ये काम करतात? प्रभागात किती लांबीचे रस्ते आणि गटारी आहेत? अशी प्रश्नांची सरबत्ती करताच अभियंता कलादगी यांचे धाबे दणाणले. ही सर्व माहिती आपल्याला लिखित स्वरूपात दिली जाईल असे सांगून त्यांनी तुम्ही पहिले नगरसेवक आहात ज्यांनी असे प्रश्न मला विचारलेत अशा शब्दात रवी साळुंखे यांच्या जागरूकतेची प्रशंसा केली.
सदर चर्चेनंतर नगरसेवक रवी साळुंखे यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता कलादगी यांना आपल्या प्रभागाचा दौरा घडवून त्या ठिकाणच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रामुख्याने श्री बसवेश्वर सर्कल खासबाग येथील नाल्याची गंभीर समस्या युद्धपातळीवर सोडवावी आणि या सर्कलचे सुशोभीकरण केले जावे अशी विनंती नगरसेवक साळुंखे यांनी केली.
सदर नाल्यामुळे निर्माण होणार्या समस्या माहिती देताना दोन-तीन ठिकाणी चेंबर करून हा नाला स्लॅब घालून बंदिस्त करावा असा सल्लाही त्यांनी दिला. तेंव्हा अभियंता कलादगी यांनी नाल्या संदर्भातील अहवाल मनपा आयुक्तांकडे पाठवून दिला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार स्वच्छता पर्यवेक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.