हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी येत्या बुधवार दि. 1 जून रोजी आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन कार्यक्रमाची कल्पना देणारे निवेदन त्यांना सादर केले.
सालाबादप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या बुधवारी 1 जून रोजी सकाळी बॉक्साइट रोड हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि महेश जुवेकर यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तालयात जाऊन आज मंगळवारी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली. यावेळी पोलिस आयुक्तांना हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाची माहिती देणारे निवेदन सादर करण्याबरोबरच 1 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणारा हा कार्यक्रम कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडला जाईल याची हमी दिली. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना देखील हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती दिली.
याप्रसंगी बेळगाव लाइव्हशी बोलताना युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जून रोजी हुतात्मा अभिवादनाचा कार्यक्रम होतो. मात्र यावेळी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे. या कार्यक्रमानंतर सरकारी परिपत्रक मराठीत मिळावीत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार ज्या ठिकाणी 15 टक्क्यापेक्षा जास्त लोक एखाद्या भाषेचे असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतील सरकारी परिपत्रके मिळाली पाहिजेत. न्यायालयाने देखील या संदर्भात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या बाजूने चार वेळा निकाल दिला आहे. मात्र तरीदेखील सरकारी कामकाजात मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यावेळी जर आमच्या या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही तर विराट मोर्चा काढला जाईल, असे स्पष्ट केले
हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावा यासाठी आजपासूनच गावोगावी फिरून जनजागृती केली जात आहे. सध्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणच्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. भविष्यात लवकरच त्या ठिकाणी मोठे भवन उभारण्यात येईल, अशी माहितीही संतोष मंडलिक यांनी दिली.
समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी हुतात्मा अभिवादनाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती देताना हुतात्म्यांना शांती लाभावी व सीमा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगितले. यावेळी आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न सुरू असून सदर कार्यक्रमानंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषेतील सरकारी परिपत्रकांच्या मागणीचे निवेदन सादर केले जाणार आहे. आमच्या या मागणीची दखल घेण्यात आली नाही तर प्रशासनाला त्याची आठवण करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी मोर्चे, मेळावे याद्वारे आंदोलन केले जाईल, असे सांगितले.
गेली 65 वर्षे सीमाप्रश्न सुटावा यासाठी बेळगावसह सीमाभागातील मराठी जनता सनदशीर मार्गाने लढा देत आहे. सीमाप्रश्न संपला असे कोणी समजू नये केंद्रीय नेते शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढेही कायम सुरू राहणार आहे. यासाठी बेळगाव शहर, तालुका खानापूर तालुका, निपाणी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्या विभागवार बैठका घेऊन मराठी भाषिक युवा पिढीला दिशा दाखवण्याचे कार्य करत आहेत. एकंदर मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम यापुढेही सुरूच राहणार आहे, असे विकास कलघटगी यांनी स्पष्ट केले.