सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत स्तुत्य असला तरी असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत तरच शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची एकजूट होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे विचार उद्योजक विजय पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवार दि 15 मे रोजी आदर्श विद्या मंदिर वडगाव येथे मराठा समाजाची जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा भव्य गुरुवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी शहरात पै रिसॉर्ट मध्ये आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके हे होते.
गुरुवंदना कार्यक्रमामुळे मराठा समाज एकत्र येत आहे ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. यापूर्वीही हा एक मराठा लाख मराठाच्या माध्यमातून समाज एकत्र आला होता. मात्र त्यामध्ये सातत्य नाही. हे सातत्य राखण्यासाठी ठराविक लोकांचा नाही तर सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. नियोजनबद्धरित्या कार्य केले तर मराठा समाजाची संपूर्ण जिल्ह्यात एकजूट होऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे, असे विजय पाटील पुढे म्हणाले.
प्रत्येक समाजाचे वर्षभरात या पद्धतीचे 1 -2 कार्यक्रम होत असतात. मराठा समाज मात्र या बाबतीत मागे पडतो. गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने आता या बाबतीत सकल मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे ही स्तुत्य बाब आहे. मात्र असे कार्यक्रम वर्षभरात सातत्याने झाले पाहिजेत. गुरुवंदना कार्यक्रमास आपण स्वतः हजेरी लावण्याबरोबरच आपल्या पै -पाहुण्यांना देखील या कार्यक्रमास हजर राहण्यास उद्युक्त केले जावे. या पद्धतीने सर्वांनी हजारोंच्या संख्येने गुरुवंदना कार्यक्रमास हजेरी लावल्यास त्याची गिनीज बुकमध्ये देखील नोंद होऊ शकते. समाजाचे या पद्धतीचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्थिक बाजू देखील महत्त्वाची असते. तेंव्हा ही बाब ध्यानात घेऊन आपण सर्वांनी आपल्यापरीने असे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात अर्थ सहाय्य केले पाहिजे, असे विजय पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीत अध्यक्ष आमदार ॲड. अनिल बेनके यांनी गुरुवंदना कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याकडे लक्ष दिले जावे अशी सूचना केली. शरद पाटील, शशिकांत चंदगडकर, बिल्डर युवराज हुलजी, उद्योजक आर. एम. चौगुले आदींनी देखील यावेळी आपले समयोचित विचार व्यक्त केले. तसेच या सर्व मान्यवरांनी रविवारच्या गुरुवंदना कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावून शोभा वाढवावी, असे आवाहन केले.
उद्योजक अजित यादव यांनी गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा समाजाचे शक्तिप्रदर्शन होईल यासाठी आपण सर्वांनी झटूया असे सांगितले. संयोजक समितीचे सदस्य असणाऱ्या राहुल मुचंडी यांनी जगद्गुरु वेदांताचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या जनजागृती संदर्भात 200 हून अधिक बैठका झाल्याचे सांगून कार्यक्रमास 1 लाखाहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अनेकांनी गुरू वंदना कार्यक्रमाला मदत जाहीर केली.
बैठकीस उद्योजक व्यापारी सकल सकल मराठा समाजाचे नेते संयोजक समितीचे सदस्य शहरातील विविध युवक मंडळांचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.