सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 15 मे रोजी आयोजित मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना व सत्कार समारंभास समस्त चव्हाट गल्ली आणि पंच कमिटीच्यावतीने जाहीररित्या संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
मराठा समाजाचे गोसावी मठ, बेंगलोरचे 7 वे मठाधीश जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांचा बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे 15 रोजी जो गुरुवंदना कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, त्यासंदर्भात चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंदिर येथे काल सोमवारी रात्री 8 वाजता सरपंच प्रताप महादेव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली समस्त चव्हाट गल्लीची बैठक पार पडली.
याप्रसंगी व्यासपीठावर सत्कार समारंभाचे संयोजक रणजीत चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, गुणवंत पाटील, किरण जाधव, सुनील जाधव, महादेव पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य आनंद अरुण आपटेकर यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत श्री मंजुनाथ स्वामीजींच्या सत्कार समारंभ भव्य प्रमाणात व्हावा यासाठी संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सदर समारंभाला बहुसंख्येने उपस्थित राहून समारंभ यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे संयोजकांची इच्छा असेल तर या सत्कार समारंभातील एखादी महत्त्वाची जबाबदारी चव्हाट गल्लीवासीय स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत बोलताना सरपंच प्रताप मोहिते यांनी स्वामीजींच्या गुरुवंदना अर्थात सत्कार समारंभास समस्त गल्लीचा संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच चव्हाट गल्लीवासियांना सत्कार समारंभाची एखादी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. गुणवंत पाटील यांनी बेंगलोरशी संबंधित मराठा समाजाचा 350 वर्षाचा इतिहास थोडक्यात विषद केला.
रमाकांत कोंडुसकर यांनी चव्हाट गल्लीतील आशीर्वाद आणि कौल बेळगावातील ज्या -ज्या कार्यक्रमांना लाभला आहे ते कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले आहेत, असे स्पष्ट केले. किरण जाधव यांनी आपल्या भाषणात प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाचा उद्देश आणि सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या प्रगती व हितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम या बाबत थोडक्यात माहिती दिली.
बैठकीस गल्लीतील नागरीक किसन रेडेकर, मोहन किल्लेकर, संदीप कामूले, मारुती सुतार,
नवनाथ कुडे, विशाल कुट्रे, अनिल गुंडकल, किरण कामूले, गणेश जाधव, ओमकार मोहीते, राहुल जाधव, राजु बेळगावकर, जयवंत काकतीकर, वसंत नेसरकर, अपर्णा कलघटकर आदींसह गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, पंच कमिटी, गल्लीतील सर्व युवक मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलावर्ग उपस्थित होता.