मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांत चार्य परमपूज्य मंजुनाथ आरती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमनिमित्त काढण्यात आलेल्या स्वामीजींच्या भव्य सवाद्य शोभायात्रेने आज रविवारी सकाळी सारा परिसर दणाणून सोडताना बेळगावातील मराठा समाजाचे विराट दर्शन घडविले.
सकल मराठा समाज बेळगावतर्फे गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित हजारो मराठा बंधू-भगिनींचा सहभाग असणाऱ्या शोभायात्रा आज सकाळी अपूर्व उत्साहात पार पडली. शोभा यात्रेपूर्वी प्रारंभी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मराठ्यांच्या पारंपरिक तूतारीच्या ललकारीसह सनई चौघड्यांच्या मंगलमय निनादात स्वामीजींचे स्वागत करण्यात आले.
स्वामीजींनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केल्यानंतर शहापूर छ. शिवाजी उद्यान येथून हरहर महादेव या गर्जनेनेसह शिवरायांसह भवानीमातेच्या जय जयकारात शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामीजी रथामध्ये विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे हत्तीवरील सजविलेल्या अंबारीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान झाली होती. शोभायात्रेतील हत्ती, घोडे विशेष करून डोक्यावर मंगल कलश घेऊन निघालेल्या सुहासिनी आणि भगवे फेटे परिधान केलेले मराठा समाज बांधव सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.
शोभायात्रेच्या पुढे ढोल व झांज पथकांसह लेझीम पथक आणि भजनी मंडळे होती. या या सर्व वाद्यवृंदाच्या गजरामुळे शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेला होता. त्याचप्रमाणे शोभायात्रेत शिवकालीन लाठी फिरवणे, तलवारबाजी दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जात होती. सध्या उष्म्याचे दिवस असल्यामुळे सकल मराठा समाज तसेच मराठा समाजातील अन्य दानशूर व्यक्ती आणि संघ संस्थांतर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी मराठा समाजाच्या भगिनींनी विशेष पुढाकार घेतला होता. या भगिनी स्टॉलवरून शीतपेय पुरविण्याबरोबरच स्वतः मोठा ट्रे घेऊन शोभायात्रेत फिरून शीतपेयांचे वितरण करत होत्या.
गुरुवंदना कार्यक्रम आणि शोभायात्रेला बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या स्वरूपात कणखर नेतृत्व तर लाभलेच आहे, याव्यतिरिक्त खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी देखील या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.C
शोभायात्रेत त्यांनी आपल्या पाठीराख्यांसमवेत आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे खानापूरमधून आलेल्या मराठी बांधवांचा उत्साह अधिकच दुणावला होता. मराठा समाज बांधवांचा हजारोंचा लवाजमा असलेल्या या मराठमोळ्या शोभायात्रेची मोठ्या जल्लोषात शहापूर खडेबाजार रस्त्यावरून नाथ पै सर्कल मार्गे वडगाव रस्त्यावरून आदर्श विद्यामंदिर मैदानावर गुरुवंदना कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता झाली.