जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्तीचे आदेश आणि सूचना देण्यात आल्या आहेत.
जनतेच्या आवाहनाला प्रतिसाद न देणे, वेळेवर सादर केलेले अर्ज योग्य प्रक्रियेशिवाय फेटाळले जात असल्याच्या तक्रारी, अर्ज निकाली काढण्याऐवजी नामंजूर करणे अशा अनेक तक्रारी येत असून या साऱ्या तक्रारींचे निवारण योग्यवेळेत आणि योग्यप्रकारे करण्यात यावे, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
राज्यात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था बेळगाव जिल्ह्यात आहेत. या माध्यमातून जनतेसाठी सक्रियपणे काम केले पाहिजे. चालू वर्षात राबविण्यात येत असलेले गृहनिर्माण व इतर प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावेत. स्थानिक संस्थांसाठी क्रमवारी प्रणालीची अंमलबजावणी करावी, शहरी विकास, घनकचरा विल्हेवाट आणि गृहनिर्माण यासह विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या निकषांसह दर पंधरवड्याला ही क्रमवारी जाहीर करून कार्यक्षमतेत वाढ करून स्वराज्य संस्था सक्षम करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
याचप्रमाणे घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांची यादी संदर्भात संबंधित मतदारसंघातील आमदारांशी त्वरित चर्चा करावी, अंतिम लाभार्थी यादी मंजूर करावी, यासंदर्भातील चौकशीत दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी दैनंदिन जीपीएस प्रक्रियेचे परीक्षण केले जाईल तसेच बँक लिंकेजसंदर्भात पुढील आठवड्यात बँकर्ससोबत बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
या बैठकीला जिल्हा नागरी विकास कक्षाचे प्रकल्प संचालक ईश्वर उळागड्डी आणि शहर स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.