बालक आणि पालक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दहावीचा निकाल राज्यात जाहीर झाला. काही विद्यार्थांनी 625 पैकी 625 गुण संपादन केले त्यांना पाहून मला देखील खूप आनंद झाला. मा जगदंबेच्या कृपेने कोरोना सारख्या अवघड परिस्थितीत देखील बहुतेक विद्यार्थांनी जे यश संपादन केले ते खरोखरच कौतुक करण्यासारखं होत.
या सगळ्यांमध्ये काही असे विद्यार्थीदेखील होते ज्यांना अपेक्षित यश नाही प्राप्त करता आलं. अपेक्षा बालकांच्या होत्या आणि त्याहून अधिक त्यांच्या पालकांच्या होत्या. याआधी परीक्षेत नापास झालो म्हणून उदास होणारे विद्यार्थी मी पहिले होते पण आज 70% / 80% गुण प्राप्त करून देखील निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या मुलांना पाहून मला माझ्या समाजाची काळजी वाटू लागली आहे. अशा मुलांसाठी खास आज हे पत्रं मी लिहत आहे. आजपासून 400 वर्षा पूर्वीचा आमचा कार्यखंड. बहुतेक आम्हास आजच्या काळाची समज नाही पण आमच्या जीवनातले दोन प्रसंग तुम्हास सांगू इच्छितो.
पहिला प्रसंग ज्यावेळेस आम्हाला आणि संभाजीराजेना आग्र्यामध्ये कैद करण्यात आले होते. प्रसंग कठीण होता. स्वराज्याचे स्वप्न पुसट होत चालले होते. कुठेतरी अपमानाचा,अपयशाचा , पराभवाचा भाव मनामध्ये निर्माण होत होता. सर्वकाही आमच्या अपेक्षांच्या विपरीत घडत होत. पण आमच्या जीवनाचं ध्येय मोठं होत, डोळ्यासमोर मा साहेब, आमची लेकरासारखी प्रजा आणि स्वराज्याचा ध्वज दिसत होता. आम्ही निराशेला बाजूला सारत आपल्या मनोबोलाच्या जोरावर कठीण परिस्थितीवर मात केली. आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर परत पुरुषार्थ करत आम्ही स्वराज्याची स्थापना केली.
मुलांनो आज दहावीचा निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही आला तर काय झाले? दहावीमध्ये ९०% मिळवणे का हेच तुमच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे? आज जीवनाच्या एका लढाईत दोन कदम मागे हटावे लागले म्हणजे जीवन संपले का? ज्या व्यक्तीचे ध्येय स्वतःच्या जीवनापेक्षा मोठे असते ती व्यक्ती छोटया मोठ्या अपयशावर आपल्या पुरषार्थयाच्या जोरावर आपल्या मनोबलाने मात करते. बाळांनो जीवनामध्ये मोठे ध्येय ठेवा, यशस्वी व्हा, माता पित्याची स्वप्न पूर्ण करा, समाजासाठी कार्य करा, राष्ट्रनिर्माण करा, विजयी व्हा.
माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. जीवनमे कभी भी किसीको उसके जरूरतो के हिसाब से नही मिलता , हर इन्सान को उसकी काबीलयत के हिसाब से मिलता है. आम्ही फक्त आमच्या मनात आले म्हणून अफझल खान सारख्या बलाढ्य शत्रूचा नायनाट नाही केला. आम्हाला त्यासाठी स्वतःला तयार करावं लागत , स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवावा लागला, शत्रूचा बळाचा अभ्यास करावा लागला, शत्रूला आमच्या आवाक्यात घेऊन यावं लागलं आणि मगच आम्ही त्या बलाढ्य शत्रूला सहजपणे काबीज केलं.
बाळांनो तुमचा शत्रू हा अफझल खानापेक्षा बलाढ्य आहे कारण तो तुमच्या आताच आहे. हा तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमची मानसिक दुर्बलता आहे. या शत्रूला ओळखा, आपल्या मनोबलाच्या जोरावर, आपल्या शक्तीने ,कर्तृत्वाने , चिकाटीने, शिस्तीने या शत्रूवर मात करा. विचार करा आम्ही तयारीविना अफझलखानाला सामोरे गेलो असतो तर, आम्ही आग्र्याला परिस्थीसमोर हरलो असतो तर स्वराज्य निर्माण झाले नसते.
रात्र वैऱ्याची आहे…उठा, डोळे पुसा, जागे व्हा, मा भवानीचे स्मरण करा, जे झाले त्यातून शिका, आता याच्या पुढचा विचार करा आणि स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर पुढचा इतिहास घडवा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे……जगदंब!
रवि बेळगुंदकर
शिवाजी नगर, बेळगाव