कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचा हा विभाग अत्यंत शिस्तबद्ध विभाग आहे. अतिशय मजबूत अशा या पोलीस यंत्रणेत कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म आड येता कामा नये. सर्वांनी दृढ संकल्पासह कर्तव्याचे पालन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. हितेंद्र यांनी केले.
बेळगावातील कंग्राळी खुर्दनजिकच्या कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल (केएसआरपी) ट्रेनिंग स्कूलच्या मैदानावर आज मंगळवारी केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल टास्क फोर्सचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. हितेंद्र बोलत होते.
कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात विविध पदव्या व पदव्युत्तर पदव्या घेऊन पदवीधर जवान दाखल झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. कर्तव्य पालनात कोणतीही कसूर राहू नये त्यासाठी प्रत्येकाने अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने काम करावे, असे पी. हितेंद्र यांनी पुढे बोलताना सांगितले.
केएसआरपी ट्रेनिंग स्कूलचे प्राचार्य रमेश बोरगावे यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शपथ विधी पार पडला. प्रारंभी तुमकूर, मंगळूर, शिमोगा, कलबुर्गी, दक्षिण कन्नड, म्हैसूर, रायचूर, उडुपी, बंगळुरू, हसन, म्हैसूर, बेळगाव अशा राज्याच्या विविध भागातून केएसआरपीमध्ये दाखल झालेल्या पोलीस जवानांनी वाद्यवृंदाच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलनातद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
या शपथविधी सोहळ्यास केएसआरपी पोलीस महानिरीक्षक रवी एस., पोलिस उपअधीक्षक एम. व्ही. रामकृष्ण प्रसाद, पोलिस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, के.एस.आर.पी-2 चे कमांडंट हुसेन यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे कुटुंबिय बहुसंख्येने उपस्थित होते.