माझी मेहनत आणि आई-वडिलांचे आशीर्वाद हे माझ्या दहावीच्या परीक्षेतील उज्वल यशाचे फलित होय, ही प्रतिक्रिया आहे व्यंकटेश योगेश डोंगरे या दहावीच्या परीक्षेत शहरात प्रथम आणि राज्यात टॉपर बनलेल्या विद्यार्थ्याची ज्याने आपल्या या यशाद्वारे मध्यमवर्गीय मुले देखील राज्यात टॉपर बनू शकतात हे दाखवून दिले आहे.
राज्यातील आज जाहीर झालेल्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेमध्ये शहरातील केएलएस इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी असणाऱ्या व्यंकटेश योगेश डोंगरे याने 625 पैकी 625 गुण संपादन केले आहेत. त्यामुळे बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबरच राज्यातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान पटकाविले आहे. यासंदर्भात बळेगाव लाइव्हशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दहावी परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारा व्यंकटेश हा टीचर्स कॉलनी खासबाग येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे हे विशेष होय.
त्याचे वडील योगेश डोंगरे हे खाजगी हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन आहेत, तर आई वैष्णवी या सहकारी पतसंस्थेत काम करतात. व्यंकटेशचे आजोबा वसंतराव डोंगरे हे बिडी (ता. खानापूर) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. आपल्या नातवाने हुशार व्हावे, शिक्षणात चांगले नांव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती ती इच्छा व्यंकटेशने दहावीच्या परीक्षेतील आपल्या उज्वल यशाद्वारे पूर्ण केली आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना व्यंकटेश म्हणाला की, आज आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझी मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे हे फळ आहे. माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी होते. आपले काम सांभाळून त्यांनी सतत मला प्रोत्साहित केले. चांचणी परीक्षांमध्ये कांही वेळेला मला कमी गुण मिळाले. त्यावेळी मला खचू न देता ते माझ्या पाठीशी उभे राहिले, तुला नक्की चांगले यश मिळेल असा आशावाद ते व्यक्त करायचे. त्यामुळेच आज मी इतके मोठे यश मिळवू शकलो, असे वेंकटेशने सांगितले.
दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा अभ्यास करणे एवढेच मी करत होतो. आता भविष्यात काय बनायचे हे मी आत्ताच ठरवली नाही. सध्या मला माझे संपूर्ण लक्ष पदवीपूर्व अभ्यासावर केंद्रित करायचे आहे असे सांगून वेळ मिळेल तेंव्हा कायम अभ्यास करा. प्रत्येकाला अडचणी येतात, आपण त्यातूनही वेळ काढून अभ्यास केला पाहिजे. मेहनत घेतल्यास यश नक्की मिळते असा संदेश व्यंकटेश डोंगरे यांनी यंदा दहावीत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह प्रामुख्याने शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वर्गाला दिले.