माध्यमांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि वस्तुनिष्ठपणे कार्य करणे व समाजात विकासाला चालना देण्यासाठी काम गरजेचे आहे आहे असे मत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केले.
बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन, बेंगलोर आणि जिल्हा शाखा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांचे पूर्वावलोकन तसेच ‘बदलते कायदे आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर ही विशेष कार्यशाळा बेळगावातील जेएमसी जिरगे भवन येथे पार पडली.कार्यशाळेचे उद्घाटन बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ केल्यावर ते बोलत होते.
हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांचे सानिध्य या कार्यक्रमाला लाभले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर होते.कारजोळ म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांची भूमिका मोठी आहे. त्यावेळी मोठी वर्तमानपत्रे छापण्याची संधी नव्हती. पण आधी हाताने लिहुन सुधारणा केलेल्या छोट्या-छोट्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रसारमाध्यमांनी ही लोकप्रियता गमावली. बदलत्या काळानुसार प्रसारमाध्यमेही बदलत गेल्याचे सांगून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरुषांच्या पत्रकारितेविषयी त्यांनी माहिती दिली. आजकाल संगणकाच्या मदतीने लाखो प्रती एकाच वेळी मिळू शकतात. वर्तमानपत्रांचे वितरण करणेही आज सोपे झाले आहे.
मोबाईल फोनवर वृत्तपत्र वाचण्याची सोयही आज उपलब्ध आहे. म्हणूनच, आज याबाबत प्रसारमाध्यमांकडून विकासाचा प्रसार करण्याचे काम व्हायला हवे असे कारजोळ यांनी सांगितले.
अनिल बेनके, बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे मानद अध्यक्ष डॉ. भीमशी जारकीहोळी, इंडियन वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष बी. व्ही. मल्लिकार्जुनय्या, ज्येष्ठ पत्रकार एच. बी. मदनगौडर, लेखिका उमा महेश वैद्य, जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संघाचे राज्य सरचिटणीस जी. सी. लोकेश, उपाध्यक्ष पुंडलीक बाळोजी, अज्जवाड रमेश कुट्टप्पा, भवानीसिंग ठाकूर, मत्तिकेरे जयराम, सोमशेखर केरगोडू आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
शिवानंद तगडूर यांनी यावेळी प्रसारमाध्यमानी लोकांची विश्वासार्हता मिळवण्याचे आवाहन केले. पत्रकाराने आधी घर आणि मग गाव जिंकले पाहिजे. घरात चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजकाल माध्यमात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रसारमाध्यमानी खऱ्या बातम्या देण्याआधीच आजकाल सोशल मिडीया नेटवर्कवर खोट्या बातम्या पसरत आहेत, सत्याला बगल देत आहे. सर्व खोट्या बातम्या धुडकावून खऱ्या बातम्या देण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. श्रमिक पत्रकार संघ तालुका पातळीपासून राज्य स्तरापर्यंत एक उत्तम संघटना बनत आहे. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन चांगले काम करण्याची गरज आहे. संघाबद्दल काही जणांची कुजबुज मी ऐकली आहे. पण आहे तेच लोक संघाचे सदस्यत्व स्वीकारत आहेत असे तगडूर यांनी सांगितले.
यावेळी श्रमिक पत्रकार संघातर्फे मंत्री गोविंद कारजोळ यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणं बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे व राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी यांचा सत्कार करण्यात आला.