कणबर्गी निवासी योजनेचा आराखडा चार वेळा मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवून देखील त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सदर आराखडा मंजूर झाला नाही तर योजनाच रद्द केली जाणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे या योजनेबद्दल पुन्हा साशंकता निर्माण झाली आहे.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अर्थात बुडाच्या कणबर्गी येथील निवासी योजनेबाबत माहिती घेण्यासाठी कांही शेतकरी बुडा कार्यालयांमध्ये गेले असता तेथील एका जबाबदार अधिकाऱ्याने मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत आराखडा मंजूर झाला नाही तर योजनाच रद्द होणार असल्याची माहिती दिल्याचे समजते.
परिणामी या योजनेसाठी जमीन दिलेले शेतकरी आता बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी योजना होणार की नाही? याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कणबर्गी निवासी योजनेला विरोध करणारे शेतकरी सतत बुडा कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. त्यामुळे योजनेला मंजुरी मिळावी यासाठी अधिकारी, आयुक्त सतत बेंगलोरला हेलपाटे घालत आहेत.
मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली नाही तर योजनेचा प्रस्ताव रद्द करून जमीन परत देण्याचा विचार बुडा प्रशासनाने चालविला आहे.