महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा विनंतीवजा मागणी शहरातील बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक -अध्यक्ष शरद पवार यांनी आपले स्नेही केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची त्यांच्या कॅम्प येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी बेळगावच्या ज्योतिर्लिंग भक्त मंडळींनी सीमाभागातील देवस्थानांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेले चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून बेळगावसह सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा विनंतीवजा मागणीचे निवेदन ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने पवार यांना सादर केले.
याप्रसंगी चव्हाट गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थानाचे भक्त प्रा. आनंद आपटेकर यांनी देवाचे उपरणे आणि श्रीफळ प्रसादादाखल देऊन माननीय शरद पवार यांचा सत्कार केला. याप्रसंगी विकास कलघटगी, विश्वास रावजी पाटील आदी उपस्थित होते.