भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉस संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देण्याबरोबरच बीम्समधील संघटनेच्या खोल्या अबाधित ठेवण्याची विनंती केली.
भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी चेअरमन अशोक बदामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी नितीश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी रेड क्रॉस जिल्हा संघटनेचे चेअरमन अशोक बदामी यांनी जिल्हाधिकार्यांचे बेळगावात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी प्रा. डी. एन. मिसाळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देऊन जिल्हा संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी शिष्टमंडळाने भारतीय रेडक्रॉस संघटना बेळगाव जिल्हा शाखा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राबाबत माहिती देण्याबरोबरच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विराप्पा यांच्याकडे बीम्सच्या वैद्यकीय अधीक्षकांनी बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील रेडक्रॉस या संस्थेच्या खोल्यांची मागणी केली आहे त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलशी भारतीय रेडक्रॉस संघटना संलग्न आहे. समाजसेवेसाठी फार पूर्वीपासून भारतीय रेडक्रॉस संघटनेला सदर हॉस्पिटलमध्ये ठराविक खोल्या देण्यात आलेल्या आहेत.
बेळगाव बीम्स हॉस्पिटलमध्ये देखील त्या आहेत. मात्र त्या खोल्या आपल्याला मिळाव्यात अशी विनंती बीम्सच्या वैद्यकीय संचालकांनी रुग्णालयाला अचानक भेट देणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. विराप्पा यांना केली आहे. न्यायाधीशांनी त्यांना याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. तेंव्हा रेडक्रॉस संघटनेच्या दृष्टीने त्या खोल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन आपण त्या खोल्या हॉस्पिटलच्या ताब्यात देऊ नयेत, अशी विनंती जिल्हाधिकारी नीतीश पाटील यांना करण्यात आली. तसेच त्या खोल्यांचा वापर रेड क्रॉसकडून कशाप्रकारे समाजोपयोगी विधायक कार्यासाठी केला जातो याची माहिती देण्यात आली.
सदर विनंतीची गांभीर्याने दखल घेण्याबरोबरच जिल्हाधिकारी पाटील यांनी रेडक्रॉस संघटना आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांची आपण लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर रेडक्रॉसच्या बेळगाव जिल्हा संघटनेकडे 6 लाख विदेशी फेसमास्क आले आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या वितरणाची बृहत मोहीम राबविण्यासाठी अशोक बदामी यांनी सदर फेसमास्क जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. याप्रसंगी विकास कलघटगी, निवृत्त लेफ्ट. कर्नल डाॅ. विनोदिनी शर्मा, जी. के. शिवयोगीमठ, प्राणेश आदी उपस्थित होते.