केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गेल्या 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 ए ए वरील बेळगाव -जांबोटी -साखळी या 69.17 कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या 240.78 कोटी रुपये खर्चाच्या दुपदरीकरण कामाचे भूमिपूजन झाले. या दुपदरीकरण्यासाठी 80 हेक्टर जमीन लागणार असून आतापर्यंत 70 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.
सरकारने यासंदर्भात गेल्या 6 मे रोजी राजपत्रित अधिसूचना जारी करताना कणकुंबी येथे 4.9627 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दुपदरीकरण्यासाठी जी 80 हेक्टर जमीन लागणार आहे त्यापैकी आत्तापर्यंत 70 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून फक्त 10 हेक्टर जमीन भूसंपादित करणे शिल्लक आहे.
केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत बेळगाव ते साखळी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 ए ए या 69.480 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे कर्नाटक व गोवा राज्य हद्दीत दुपदरीकरण केले जाणार आहे.
अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) तत्वावर हे रस्त्याचे काम केले जाणार असून काम पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षाचा आहे. भारतमाला परियोजना अंतर्गत बेळगावपासून मच्छे, पिरनवाडी, नावगे, किणये, कुसमळी, जांबोटी, कालमनी, कणकुंबी, पोरिम, मटनी मार्गे साखळी असे राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण होणार आहे.