मराठी विद्यानिकेतनचा दहावीचा ब्लड कॅन्सर पीडित गुणवंत विद्यार्थी गणेश परशुराम गोडसे याच्या उपचाराकरिता आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले असून मदत निधी उभारण्यासाठी बेळगाव लाईव्हने देखील पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने आज धनादेशाद्वारे जमा झालेली मदत बेळगाव लाईव्हने मराठी विद्यानिकेतन व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली आहे.
मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या दहावी बॅचमधील गणेश परशुराम गोडसे हा विद्यार्थी यंदाच्या वार्षिक परीक्षेत 96.64 टक्के गुण संपादन करून गुणवत्तेत उत्तीर्ण झाला आहे. परंतु दुर्दैवाने यादरम्यान त्याला रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) असल्याचे निदान झाल्यामुळे त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मराठी विद्यानिकेतन शाळेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. या कामी बेळगाव लाईव्हने देखील पुढाकार घेतला आहे. आजारी गणेश संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन आज सकाळपासून अनेकांनी बेळगाव लाईव्हकडे विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच बऱ्याच जणांनी ऑनलाइन आर्थिक मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, शहरातील दोन उद्योजकांनी आज शनिवारी उस्फूर्तपणे प्रत्यक्ष भेटून बेळगाव लाईव्हकडे गणेश याच्या वरील उपचारासाठी मदतीचे धनादेश सुपूर्द केले. उद्योजक अमर सरदेसाई आणि अभियंता कुलदीप मोरे यांनी प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे मदत देऊ केली आहे. या सर्वांनी देऊ केलेले मदतीचे धनादेश बेळगाव लाईव्हने त्वरित मराठी विद्यानिकेतन व्यवस्थापनाकडे जमा केले. या पद्धतीने गणेश गोडसे यांच्यावरील उपचारासाठी निधी उभा करण्यास सहकार्याचा हात पुढे केल्याबद्दल मराठी विद्यानिकेतन व्यवस्थापनाने टीम बेळगाव लाईव्ह आणि दीपक पावशे धन्यवाद दिले आहेत.
याखेरीज सुप्रसिद्ध वकील ॲड. सुधीर चव्हाण यांनी देखील 1500 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.एकंदर शैक्षणिक जीवनातील दहावीचा पहिला महत्वाचा टप्पा उत्तम प्रकारे ओलांडणाऱ्या गणेश गोडसे याच्यावरील उपचारासाठी आर्थिक मदतीचा ओघ आता हळूहळू वाढू लागला आहे.
पीडित विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी खालील खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खातेदाराचे नांव : प्रिन्सिपल मराठी विद्यानिकेतन, खाते क्र. 1233000100160285, बँकेचे नांव : पंजाब नॅशनल बँक, आयएफएससी कोड : पीयुएनबी 0123300.
मी भारत होनगेकर..
१००० रुपये स्टेट बँक मधून ट्रान्स्फर केले