जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्नासंदर्भात बोलताना म्हटले की, सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात असताना बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी चुकीची आहे. त्यांच्या या विधानानंतर बेळगावमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सबनीस यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगितले.
श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार सीमाभागातील प्रत्येक सीमावासियांची हीच भूमिका असून ही मागणी योग्य असल्याचे ते म्हणाले .सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या याचिकेत केंद्रशासित करण्याची मागणीही करण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टाने ही मागणी मागे घेण्यासंदर्भात सुचविले. सीमाभाग केंद्रशासित करण्याऐवजी हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
सीमाप्रश्न सोडवून संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या पासष्ट वर्षांपासून करत असून याच भूमिकेवर सीमावासीय देखील ठाम आहेत. यामुळे सबनीस यांचे वक्तव्य योग्यच असून या वक्तव्यासंदर्भात कदापिही माफी मागितली जाणार नसल्याचे किणेकर यांनी स्पष्ट केले.
श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आयोजकांनी माफी मागावी अशी मागणीही बेळगाव मधील काही प्रसारमाध्यमांनी केली असून श्रीपाल सबनीस यांनी माफी मागण्याचे कोणतेही कारण नसल्याचे माजी आमदार किणेकर म्हणाले. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सीमा प्रश्नासंदर्भात केलेले विधान हे योग्य असून सबनीस यांच्या मताशी आयोजक देखील सहमत असल्याचे किणेकर यांनी स्पष्ट केले.