यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात विलंब होणार असल्यामुळे शिक्षण खात्याने सर्व शाळांना ‘बुक बँक’ तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शाळांनी पुस्तके जमा करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील 2022 -23 सालच्या शैक्षणिक वर्षाला काल सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मात्र सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिक्षण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना नवी पुस्तके देण्यास विलंब होणार आहे. परिणामी बुक बँक तयार करण्याची सूचना सर्व शाळांना करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. यावेळी शाळा लवकर सुरू झाल्यामुळे पुस्तक छपाईचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. तथापि पाठ्य पुस्तकं वितरणाला विलंब होणार आहे.
नववी पाठ्यपुस्तक वितरणास होणारा विलंब लक्षात घेऊन शिक्षण खात्याने सर्व शाळांना ‘बुक बँक’ तयार करून गेल्यावर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून मागून घ्या अशी सूचना केली आहे. त्यानुसार शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांची संपर्क साधून पुस्तके आणून देण्याचे आवाहन केले आहे. एकंदर विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या शाळेत जमा झालेली पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. नवीन पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर ती विद्यार्थ्यांना वितरित केली जातील, असे बेळगावचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी सांगितले आहे.