रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाची खडी -माती मुख्य गटारीत पडून गटार बुजल्यामुळे भांदूर गल्ली व पाटील मळा पाठीमागील भरवस्तीतील गटारी मोठ्या प्रमाणात तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सध्या रेल्वे मार्ग दुपदरी करण्याचे काम सुरू आहे. स्टेशनपासून पुढे आल्यानंतर पाटील मळ्याच्या बाजूला रेल्वे खात्याने भिंत बांधली होती ती पडून पंधरा-वीस वर्षे झाली. येथील नाल्यांच्या बाजूने एक मोठी गटार गेली आहे जी भांदूर गल्ली व पाटील मळ्याच्या मागच्या बाजूला येते.
सध्या सुरू असलेल्या दुपदरीकरणाच्या कामाची खडी व माती मोठ्या प्रमाणात या गटारीमध्ये पडल्यामुळे गटार पूर्णपणे बुजून गेली आहे. त्यामुळे या मोठ्या गटारामार्गे सांडपाण्याचा निचरा होणे बंद झाले असून ते सांडपाणी पाटील मळा व भांदुर्गे गल्ली येथील घरांच्या मागील बाजूच्या भंगीबोळ पॅसेजमधील दोन्ही बाजूच्या गटारी एकत्र तुंबून ओव्हरफ्लो होत आहेत.
सदर प्रकारामुळे वहिवाटीचा रस्ता असणाऱ्या भंगी बोळ पॅसेजमध्ये दुर्गंधीयुक्त पसरण्याबरोबरच अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणच्या घरांच्या मागील बाजूस असणाऱ्या गुरांच्या कांही गोठ्यामध्ये हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी शिरले आहे. परिणामी गुरांच्या मालकासह या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
भरवस्तीतील गटारी तुंबण्यास मुख्य गटारांमध्ये पडलेली खडी -माती कारणीभूत असल्यामुळे भांदूर गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक विजय होनगेकर हे स्वतः खुद्द दोन दिवसापासून रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून मुख्य गटारात पडलेली रेल्वेमार्ग दुपदरीकरणाची खडी -माती काढण्याची विनंती करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
तेंव्हा महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रामुख्याने बेळगाव शहराच्या आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.