belgaum

11 रोजी द. म. शिक्षण मंडळ सुवर्ण महोत्सवाची सांगता

0
19
Dms
 belgaum

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा 2019 -20 सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाच्या साप्ताहिक राष्ट्रवीरचा शताब्दी महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता ज्योती महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती द. म. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील यांनी दिली.

शहरात आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ॲड. राजाभाऊ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती महाविद्यालय येथे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सरोज एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सदर सुवर्णमहोत्सवी व शताब्दी महोत्सव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक -अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.Dms

राष्ट्रवीर साप्ताहिक साप्ताहिकाचा पहिला अंक शिवजयंतीला 9 मे 1921 रोजी प्रकाशित झाला. तेंव्हापासून गेली शंभर वर्षे हे साप्ताहिक अखंडपणे सुरू आहे. राष्ट्रवीरने बेळगाव सीमा भागातील बहुजन समाजात सत्यशोधकी विचारांची पेरणी केली. बुद्धी प्रामाण्यवाद रुजविला. अंधश्रद्धेच्या मुळावर घाव घातला त्यातून तरुणांच्या कित्येक पिढ्या घडल्या. बेळगाव हे सत्यशोधक चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. राष्ट्रवीर साप्ताहिक ज्या प्रेरणेने आणि हेतूने सुरू झाले तीच प्रेरणा आणि तोच हेतू दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या स्थापने मागे होता. भाई दाजिबा देसाई यांनी आपल्या काही तरूण सहकाऱ्यांना घेऊन या संस्थेची स्थापना 7 मे 1965 रोजी केली. भाई दाजिबा देसाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. प्राचार्य एस. वाय. पाटील यांनी दीर्घकाळ संस्थेचे सचिवपद आणि भाई दाजिबा देसाई यांच्या निधनानंतर जेष्ठ विचारवंत भाई एन. डी. पाटील यांनी अध्यक्षपद सांभाळले असे सांगून ॲड. पाटील यांनी द. म. शिक्षण मंडळाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली.

 belgaum

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून एक वरिष्ठ महाविद्यालय, 5 कनिष्ठ महाविद्यालय, 34 माध्यमिक शाळा आणि 3 प्राथमिक शाळा आज ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. बेळगावात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी एक-एक वस्तीगृह सुरू आहे. शिक्षणाबरोबरच द. म. शिक्षण मंडळाने राष्ट्रवीर सारखेच बहुजन समाज उद्धाराचे कार्य सुरू ठेवले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, भाई दाजीबा देसाई आणि प्राचार्य एस. वाय. पाटील यांच्या पुण्यतिथीना व्याख्याने आयोजित केली जातात महाराष्ट्रातील अनेक विचारवंत या व्याख्यानांना हजेरी लावतात.

साप्ताहिक राष्ट्रवीर आणि द. म. शिक्षण मंडळाने सुरुवातीपासून ते आजतागायत कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केलेली नाही. आज शिक्षणाचा बाजार सुरू असतानाही द. म. शिक्षण मंडळ त्यापासुन कित्येक कोस दूर आहे. अगदी कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती त्यांची योजना केली आहे, असेही ॲड. राजाभाऊ पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस सुवर्णमहोत्सवी समितीचे सदस्य आणि छ. शाहू प्रकाशन मंडळाचे विश्वस्त उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.