न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत धामणे ग्रामपंचायतीकडून गावच्या स्मशानभूमीच्या जागेमध्येच ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारण्याचा अट्टाहास केला जाण्याबरोबरच आता त्याठिकाणी जेसीबीच्या साह्याने काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणे ग्रामपंचायत इमारत मोडकळीस आल्याने नव्याने ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी गावातील स्मशानभूमीच्या सर्व्हे नं. 115 मधील 2 एकर 18 गुंठे हिंदू स्मशान असलेल्या जागेमध्ये नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची नूतन इमारत बांधण्याचा घाट रचला जात असून याला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. गावातील मोडकळीस आलेली जुनी इमारत काढून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. कारण जुनी ग्रामपंचायत इमारत ही गावकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणीच नवी इमारत बांधण्यात यावी असा सर्वांचा आग्रह असताना ग्रामपंचायतीने 1 महिन्यापूर्वी स्मशानभूमीच्या जागेमध्ये भूमिपूजन केले आहे.
याबाबतची कुणकुण लागताच गावकरी न्यायालयात धाव घेऊन कामाला स्थगिती आदेश मिळवतील या भीतीपोटी ग्रामपंचायत पीडिओंनी न्यायालयातून केव्हीट मिळवून घेतला आहे. तथापि धामणे गावकऱ्यांनी स्मशानाच्या जागेत कसलेही बांधकाम किंवा खुदाई करू नये असा रीतसर आदेश न्यायालयाकडून मिळविला आहे.
याबाबत ग्रामपंचायत पीडिओ आणि ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांना न्यायालयाने गेल्या 17 मे 2022 रोजी न्यायालयात हजर राहावे अशी नोटीस बजावली होती. परंतु यापैकी कोणीही न्यायालयात हजर न होता. यापद्धतीने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुन्हा गेल्या मंगळवार दि. 24 मेपासून ग्रामपंचायतीच्यावतीने स्मशानभूमीच्या जागेत बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने कॉलम उभारणीसाठी खड्डे मारण्यात येत आहेत.
हे काम नरेगा योजनेअंतर्गत येत असताना जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या काम केले जात आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान करून अशाप्रकारे बेकायदेशीर काम करण्याचा अधिकार पीडीओंना कोणी दिला? तसेच जुन्या ग्रामपंचायत इमारतीच्या ठिकाणी नवी इमारत उभारणे सोयीची असताना स्मशानभूमीच्या जागेतच नवी इमारत बांधण्याचा अट्टहास का? असा संतप्त सवाल केला जात आहे.