बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला असून अनेक राजकारणी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी आग्रह करत आहेत . याच पार्श्वभूमीवर संकेश्वर येथे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांची भेट घेत बैलहोंगल येथील मठाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली आहे.
बेळगाव, चिकोडी, आणि बैलहोंगल अशा तीन विभागात जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बैलहोंगल मधील मठाधीश यांच्या नेतृत्वाखाली उमेश कत्ती यांना निवेदन सादर केले आहे. यापूर्वी बेळगाव, चिकोडी आणि गोकाक अशा तीन विभागात बेळगाव जिल्ह्याचे विभाजन केले जावे, अशी मागणी ऐकू येत होती. मात्र अचानक स्वतंत्र बैलहोंगल जिल्ह्याची मागणी करण्यात आल्याने बेळगाव, चिकोडी, बैलहोंगल कि बेळगाव, चिकोडी, गोकाक असे विभाजन होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आज उमेश कत्ती यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने बैलहोंगलला बेळगावचा उपजिल्हा जाहीर करावा अशी मागणी केली आहे. संकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवजयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या उमेश कत्ती यांना सदर शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे. या शिष्टमंडळात बैलहोंगल मधील मठाधीश, जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मुडलगी, माजी आमदार विश्वनाथ पाटील, माजी आमदार जगदीश मेटगुड यांचा समावेश होता.
या निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर उमेश कत्ती म्हणाले, विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करणे आवश्यक आहे. धारवाड जिल्ह्याचे विभाजनात गदग आणि हावेरी हे स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्यात आले या धर्तीवर बेळगाव जिल्ह्याचे विभाजन बेळगाव, चिकोडी, बैलहोंगल अशा पद्धतीने व्हावे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन हे विकासाच्या दृष्टिकोनातून पूरक ठरेल, अशी प्रतिक्रिया उमेश कत्ती यांनी व्यक्त केली.
यापूर्वी बेळगाव, चिकोडी, गोकाक ही मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. परंतु अचानकपणे बैलहोंगल जिल्ह्याचे नाव पुढे आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी वनविभाग आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे अग्रेसर होते. उमेश कत्ती यांच्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलून धरला होता. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी जोर धरू लागली आहे. बैलहोंगल येथील हे शिष्टमंडळ बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी मुख्यमंत्र्यांची ही भेट घेणार असल्याचे समजते.