जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्नासंदर्भात बोलताना म्हटले की, सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात असताना बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी चुकीची आहे. त्यांच्या या विधानानंतर बेळगावमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांनी सांगितले कि, श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्नाचा संपूर्ण अभ्यास करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
२००७ साली सुप्रीम कोर्टात सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. यादरम्यान दोन्ही बाजू ऐकून सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी हि राजकीय असून सुनावणीच्या टप्प्यावर आलेल्या याचिकेत अशा प्रकारची मागणी न करण्याचे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुचविले होते. न्यायाधिशांच्या या सल्ल्यानंतर आपणदेखील हि मागणी करू नये असा सल्ला आपल्या वकिलांनी दिला.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपण एखादा मुद्दा उपस्थित केल्यास न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होईल, असे स्पष्ट संकेत वकिलांनी दिले. यावेळी कै. ऍडव्होकेट भंडारी आणि अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही नेत्यांनी केंद्रशासित करण्याचा मुद्दा आपल्या स्वार्थासाठी उपस्थित केला. हा मुद्दा आपल्या दृष्टिकोनातून घातक आहे. हाच मुद्दा श्रीपाल सबनीस यांनी हेरून आपले मत व्यक्त केले. त्यामुळे हा मुद्दा अतिशय ताणू नये, असे आवाहन दीपक दळवी यांनी केले.
सीमाभाग केंद्रशासित करू नये हा मुद्दा श्रीपाल सबनीस यांनी अभ्यासपूर्वक आणि प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे हा मुद्दा आणि हि मागणी ग्राह्य आहे. वाद वाढविण्यासाठी हा प्रश्न कोणीही चिघळवु नये. न्यायालयाच्या कामकाजानुसार आणि सीमावासियांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपली बाजू योग्यपणे न्यायालयात मांडावी, यासंदर्भात श्रीपाल सबनीस आणि आयोजकांनी माफी मागण्याचे कोणतेही कारण नसल्याचे दळवींनी स्पष्ट केले.