बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत असल्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकारी नितीश पाटील यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील प्रामुख्याने बैलहोंगल, खानापूर आणि कित्तुर या तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यंदा मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात असून देखील योग्य भाव उपलब्ध नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच बरेच ठिकाणी शेतकऱ्यांची योग्य दरात अभावी फसवणूक होत आहे.
ही फसवणूक रोखण्यासाठी सरकार पर्यायाने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी शेतकरी संघटनांचा नेत्यांसह मिरची उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.